पंतप्रधान कार्यालयात झाल्या दोन महत्त्वाच्या नियुक्त्या; नरेंद्र मोदींच्या खास मर्जीतले अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:33 AM2019-09-12T02:33:18+5:302019-09-12T06:43:25+5:30
पी.के. मिश्रा नवे प्रधान सचिव, तर पी.के. सिन्हा प्रधान सल्लागार
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अतिरिक्त प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांना पंतप्रधान कार्यालयामध्ये प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. याआधी या पदावर असलेल्या नृपेंद्र मिश्रा यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी पी.के. सिन्हा यांची करण्यात आलेली नियुक्ती मात्र आश्चर्यकारक आहे.
पी.के. मिश्रा यांच्या जागी अतिरिक्त प्रधान सचिवपदी पी.के. सिन्हा यांची निवड होईल, असे मानले जात होते. मात्र, तसे न होता वेगळेच घडले. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीशी किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीशी निगडित आहेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
नृपेंद्र मिश्रा यांनी प्रधान सचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मोदी इतर काही जबाबदारी देतील, अशी अटकळ बांधण्यात होती. माजी वित्तमंत्री अरुण जेटली राहत होते तो कृष्ण मेनन मार्गावरील ८ क्रमांकाचा बंगला नृपेंद्र मिश्रा यांना देण्यात आला होता. या बंगल्याची दुरुस्ती करण्याचे आदेशही मिश्रा यांनी दिले होते. मात्र, तिथे राहायला जाण्याआधीच त्यांनी प्रधान सचिवपदाचा राजीनामा दिला.
पंतप्रधानांच्या खास मर्जीतले अधिकारी
बुधवारी झालेल्या दोन नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर यापुढे नवे प्रधान सचिव पी.के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा हे मोदी यांच्या खास विश्वासातले अधिकारी पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची भूमिका बजावतील. या कार्यालयात गेल्या आठवडाभरात सहा नव्या नियुक्त्या झाल्या आहेत.