गटबाजीने पोखरलेल्या नितीश कुमारांच्या जेडीयूमध्ये आज होणार दोन स्वतंत्र बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 11:44 AM2017-08-19T11:44:49+5:302017-08-19T11:51:47+5:30
बिहारच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरामुळे हाहाकार निर्माण झाला असला तरी, राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.
पाटणा, दि. 19 - बिहारच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरामुळे हाहाकार निर्माण झाला असला तरी, राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. अंतर्गत मतभेद तीव्र झालेल्या सत्ताधारी जनता दल युनायटेडमधील दोन गटांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. जदयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक घेणार आहेत.
त्याचवेळी बंडखोरीच्या तयारीत असलेले जदयू नेते शरद यादव एस.के.मेमोरीयल हॉलमध्ये बैठक घेणार आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा नितिश कुमार यांचा निर्णय शरद यादव यांना अजिबात पटलेला नाही. त्यांचा भाजपासोबत जाण्याला ठाम विरोध आहे.
नितीश कुमार यांच्या निवासस्थानी होणा-या बैठकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. शरद यादव जी बैठक घेणार आहेत त्यात ते नितीश कुमारांवर जोरदार तोडसुख घेतील असा अंदाज आहे. कारण यापूर्वीही त्यांनी नितीश कुमारांवर टीका केली आहे. या बैठकीआधीच जदयूच्या दोन गटांमध्ये पोस्टर युद्ध भडकले आहे.
दरम्यान जदयूचे दुसरे नेते के.सी. त्यागी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद यादव यांना राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीला निमंत्रित केले आहे. तिथे मतभेदांच्या मुद्यांवर तोडगा निघू शकतो पण त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या कार्यक्रमाला हजर राहू नये.
Sharad Yadav Ji is invited (for JDU National Exec. meet),he can sort out differences but he shouldn't attend Lalu Yadav's program: KC Tyagi pic.twitter.com/b6rvfBXonA
— ANI (@ANI) August 19, 2017
मी इंदिरा गांधींचांही सामना केला आहे, आता कोणालाच घाबरत नाही
जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे.