अतिरेकी हल्ल्यात दोन जवान शहीद, दोन अतिरेकीही ठार; तोयबाशी संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:28 AM2017-10-12T01:28:13+5:302017-10-12T01:28:43+5:30
काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचे दोन जवान हुतात्मा झाले.
श्रीनगर : काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. मिलिंद किशोर खैरनार व निलेश कुमार अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे हवाई दलाच्या गरुड पथकाचे कमांडो होते.
हाजिन भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या भागाभोवती वेढा घातला. गरुड पथकातील जवानांना अनुभव व प्रशिक्षणाचा भाग म्हणून या आॅपरेशनमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. सुरक्षा दलांनी वेढा घालताच, अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात दोघे जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना, त्यांना वीरमरण आहे. मात्र दोन्ही दहशतवाद्यांचा खातमा करण्यातही सुरक्षा दलांना यश आले.
अली उर्फ अबू माझ व नसरुल्ला मीर अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. हे दोघे लश्कर-ए-तोयबाचे असून, अबू माझ हा पाकिस्तानी नागरिक आहे व नसरुल्ला मीर हा स्थानिक अतिरेकी आहे. हिज्बुल मुजाहिद्दिनच्या अतिरेक्यांना शस्त्रे पुरवण्याच्या आरोपावरून दोन पोलिसांना बुधवारी अटक करण्यात आली. त्या दोघांचा अतिरेकी संघटनेशी संबंध होता आणि त्यांनी संघटनेच्या अतिरेक्यांना शस्त्रसाठा पुरवला होता, असे तपासात आढळून आल्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. त्या पोलिसांकडेही शस्त्रसाठा सापडल्याची माहिती त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)
गृहमंत्र्यांशी चर्चा-
नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील परिस्थितीशी माहिती दिली.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात राहणाºया भारतीयांच्या समस्या लक्षात घेणे व त्यावर तोडगा काढणे यासाठी समिती नेमण्याबाबतही त्या दोघांमध्ये चर्चा झाली.