राजेंद्र तुपारेसह काश्मिरात दोन जवान शहीद
By admin | Published: November 7, 2016 06:48 AM2016-11-07T06:48:56+5:302016-11-07T06:48:56+5:30
काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून झालेले शस्त्रसंधीचे प्रयत्न हाणून पाडताना राजेंद्र नारायण तुपारे आणि शिख रेजिमेंटचे शिपाई गुरसेवक सिंग हे भारतीय लष्कराचे दोन जवान रविवारी शहीद झाले.
श्रीनगर : काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून झालेले शस्त्रसंधीचे प्रयत्न हाणून पाडताना मराठा रेजिमेंटचे नायक राजेंद्र नारायण तुपारे (३२) आणि शिख रेजिमेंटचे शिपाई गुरसेवक सिंग हे भारतीय लष्कराचे दोन जवान रविवारी शहीद झाले. राजेंद्र तुपारे हा कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावचा सुपुत्र होता तर गुरसेवक सिंग पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील वारणा गावचा होता.
‘सर्जिकल स्ट्राइक्स’नंतरही काश्मीरमध्ये अतिरेकी घुसविण्याची पाकिस्तानची कारस्थाने सुरुच आहेत. पुंछ सेक्टर आणि कृष्णा घाटी येथे सीमेवरून अतिरेक्यांना घुसता यावे यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरु केला. भारतीय लष्कराने त्यास जोरदार प्रत्युत्तर देत हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले. एवढेच नव्हे तर प्रतिहल्ला करून सीमेच्या पलिकडील पाक चौक्यांचे मोठे नुकसानही केले.
मात्र या धुमश्चक्रीत कृष्णा घाटी येथे शिपाई गुरचरण सिंग व पुंछ सेक्टरमध्ये राजेंद्र तुपारे गंभीर जखमी झाले व नंतर त्यांचे निधन झाले. पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या तोफांच्या माऱ्यात सलीमा अख्तर व झरीफा बेगम या दोन स्थानिक नागरिक जखमी झाल्या.बीएसएफचे उपनिरीक्षक नितीन कुमार हे जखमी झाले असून त्यांना सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.