दोन न्यायाधीश भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत
By admin | Published: September 12, 2015 04:56 AM2015-09-12T04:56:11+5:302015-09-12T04:56:11+5:30
खटल्याच्या निपटाऱ्यासाठी व अनुकूल निर्णयासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात निलंबित झालेल्या दोन न्यायाधीशांना गुजरात उच्च न्यायालयाच्या
अहमदाबाद/वलसाड : खटल्याच्या निपटाऱ्यासाठी व अनुकूल निर्णयासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात निलंबित झालेल्या दोन न्यायाधीशांना गुजरात उच्च न्यायालयाच्या दक्षता पथकाने चौकशीअंती लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शुक्रवारी अटक केली. वलसाडच्या न्यायालयाने ए. डी. आचार्य आणि पी. डी. इनामदार या दोघाही न्यायाधीशांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
असा केला भंडाफोड...
अॅड. पटेल यांनी त्यांच्या न्यायालयातील कक्षात छुपे कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल २०१४ या कालावधीतील या न्यायाधीशांच्या सर्व हालचाली टिपण्यात आल्या आहेत. रेकॉर्डिंगमध्ये हे न्यायाधीश वकिलांसोबत दूरध्वनीवर आणि प्रत्यक्ष भेटीतही त्यांच्या पक्षकाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी पैशाच्या देवाणघेवाणीवर चर्चा करीत होते.
निलंबनाच्या वेळी आचार्य हे भावनगर जिल्ह्यातील शिहोर तालुक्यात तर इनामदार जामनगर जिल्ह्याच्या जमखांभलिया तालुका न्यायालयात न्यायाधीश होते. न्यायाधीश आणि इतर १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर उभयतांवर निलंबनाची कारवाई केली. इतर आरोपींमध्ये स्टेनोग्राफर, लिपिक आणि आठ वकिलांचा समावेश आहे.
जि.प.च्या मुख्य लेखापालाला अटक
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी प्रवीण देवीचंद जैन याला त्याच्या कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.