खासगी फोटो फेसबुकवर, IPS-IAS महिला अधिकारी भिडले; दोघींनाही महागात पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 08:10 AM2023-02-22T08:10:11+5:302023-02-22T08:10:55+5:30
सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. अखेर मंगळवारी दुपारी दोघींचीही पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली.
खासगी फोटो शेअर करण्यावरून सोशल मीडियावरील भांडण कर्नाटकमधील आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी. रूपा मौदगिल या दोघींना महागात पडले.
रविवारी रूपा यांनी रोहिणीचे खासगी फोटो फेसबुकवर शेअर केल्याने वाद चिघळला. रोहिणीने पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना तिचे फोटो पाठवून नियमांचे उल्लंघन केले, २०२१-२०२२ मध्ये ३ अधिकाऱ्यांना तिने माझे फोटो पाठवले, असा आरोप रूपाने केला होता. एक दिवस आधी रूपा यांनी सिंधुरीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची लांबलचक यादी जाहीर केली होती. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केल्याचा दावा केला होता. त्यानंतर संतप्त रोहिणी यांनी सर्व आरोप फेटाळले आणि रूपा माझ्याविरोधात वैयक्तिक द्वेषातून “खोटी, वैयक्तिक निंदा मोहीम” चालवत असून कारवाईची धमकी देत असल्याचे सांगितले.
माझ्या बदनामीसाठी व्हॉट्सॲपवरील स्टेटसचे स्क्रिनशॉट गोळा केलेत, जर मी फोटो पाठवले असतील तर त्या अधिकाऱ्यांची नावे उघड करावी, असे आव्हान दिले. त्यानंतर दोघींनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे एकमेकांविरुद्ध तक्रार केली होती. त्याआधी सोमवारीच राज्याच्या गृहमंत्र्यांनी दोघींनाही “वाईट वर्तन” बद्दल कारवाईचा इशारा दिला होता. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. अखेर मंगळवारी दुपारी दोघींचीही पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली. शिवाय, डी रूपा यांचे आयएएस पती मुनीष मौदगील यांचीही बदली करण्यात आली.