लष्करातील महिलांच्या 100 जागांसाठी आले तब्बल दोन लाख अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:56 PM2019-07-04T14:56:48+5:302019-07-04T14:58:13+5:30
लष्करामध्ये प्रथमच अधिकारी रँकच्या खालील महिलांची भरती होत असून, या भरती प्रक्रियेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
नवी दिल्ली - लष्करामध्ये प्रथमच अधिकारी रँकच्या खालील महिलांची भरती होत असून, या भरती प्रक्रियेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. लष्कराच्या पोलीस कोअरमधील जवानांच्या 100 पदांसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज पाठवले आहेत.
आतापर्यंत लष्करामध्ये केवळ अधिकारीपदांवरच महिलांची भरती होत असे. तसेच युद्धनौका आणि पाणबुड्यांवरील सेवेपासूनही महिलांना दूर ठेवले जाई. त्याबरोबरच लष्करातील पायदळ, चिलखती कोअर आणि तोपची सैनिक या पदांवर महिलांना सेवा देता येत नसे. मात्र आता महिलांसाठी लष्करातील अधिकारी रँकच्या खालील पदासाठी पहिल्यांदाच भरती होत आहे.
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''महिलांना शिपाई म्हणून लष्कराच्या पोलीस कोअरमध्ये भरती करणे हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. 25 एप्रिलपासून लष्कराच्या पोलीस कोअरमध्ये 100 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली होती. आता या भरतीसाठीचे शिबीर याच महिन्याच्या शेवटी बेळगाव येथे होणार आहे.''
त्याबरोबरच भारतीय लष्कर प्रादेशिक सेनेमध्ये एक महिला प्रोव्होस्ट युनिटची स्थापना करण्याची योजना आखत आहे. असे पहिल्यांदाच होणार असून, या युनिटमध्ये दोन अधिकारी, तीन ज्युनियर कमिशंड अधिकारी आणि एकूण 40 शिपाई असतील. दरम्यान यासाठी अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. मात्र त्यासाठी आवश्यक ती मंजुरी लवकरच मिळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
लष्करामध्ये अधिकारी रँकच्या खालील जवान पदांवर सुमारे 1700 महिलांची भरती करण्याचा लष्कराचा मानस आहे. ही भरती प्रक्रिया पुढील 17 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाईल.