राज्यात तीन वर्षांत २ लाख कोटींचे रस्ते

By admin | Published: July 23, 2016 04:17 AM2016-07-23T04:17:46+5:302016-07-23T04:17:46+5:30

महाराष्ट्रात येत्या ३ वर्षांत रस्तेबांधणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाची २ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.

Two lakh crores road in three years in the state | राज्यात तीन वर्षांत २ लाख कोटींचे रस्ते

राज्यात तीन वर्षांत २ लाख कोटींचे रस्ते

Next

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- महाराष्ट्रात येत्या ३ वर्षांत रस्तेबांधणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाची २ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. त्यांसाठी राज्य सरकार जितक्या लवकर भूसंपादनाची करेल, तितक्या वेगाने रस्तेबांधणी केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह आणि पत्रकारांच्या साक्षीने संवाद साधला. त्यातून राज्यातील रस्त्यांसंबंधी अनेक प्रलंबित विषय चर्चेतून निकाली निघाले.
नागपूर ते रत्नागिरी नवा महामार्ग
नागपूर ते रत्नागिरी व्हाया तुळजापूर या नव्या सिमेंट काँक्रीट महामार्गासाठी परिवहन मंत्रालयाने ८ हजार कोटी मंजूर केले आहेत. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र आणि कोकण अशा ४ विभागातून जात असल्याने ९ टप्प्यात त्याची विभागणी करण्यात आली आहे. या महामार्गासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी केंद्राने महाराष्ट्राकडे ४ हजार कोटी जमा केले आहेत.
मात्र नागपूर ते तुळजापूर टप्प्यांत भूसंपादनच्या काही अडचणी असून, आपण तिथे स्वत: जाणार आहोत आणि त्यासाठी संबंधित जिल्ह्यात ग्रामीण भागात एकास चार तर
शहरी भागात एकास दोन याप्रमाणे भूसंपादनाची रक्कम डिसेंबरपूर्वी
दिली जाईल, असे वचन चंद्रकांत पाटील यांनी गडकरींना दिले. या महामार्गाची टेंडरप्रक्रिया तूर्त पुढे ढकलावी अशी विनंतीही पाटील यांनी केली.
वारी मार्गावर प्रशस्त ४ लेन रस्ता
पंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी हा विठ्ठलाच्या वारीचा मार्ग आहे. सुमारे ५00 किलोमीटर्सच्या या ४ लेन रस्त्यासाठी ६ हजार कोटींची योजना तयार आहे. या रस्त्याच्या दोन्ही कडेला महाराष्ट्राने थोडी आणखी जागा संपादन करून दिल्यास वारकऱ्यांना उतरण्यासाठी उत्तम ठिकाणे, प्रशस्त उद्याने, वाहनतळे, भोजनगृहे, इत्यादी सोयी करून देण्याची तयारी असल्याचे गडकरी म्हणाले.
नद्यांचे मोफत खोलीकरण
महाराष्ट्रातल्या नद्यांना सध्या पूर आलेत. पुराबरोबर जो गाळ वाहून येतो, त्याचे वर्षानुवर्षे ड्रेझिंग होत नाही. परिणामी नदी पात्रे लहान होतात आणि पाणीसाठाही कमी होतो. त्यावर गडकरींनी महाराष्ट्रातल्या नद्यांचे मोफत ड्रेझिंग आम्ही करून देण्यास तयार आहोत. यामुळे नद्यांचे खोलीकरण होईल. पाण्याचा साठा वाढेल व त्यावर जलवाहतुकीसारख्या सोयींची निर्मितीही होईल, असे सांगितले. या कामाच्या बदल्यात खोलीकरणाच्या वेळी पात्रातून निघणारी सारी वाळू परिवहन मंत्रालयाला राज्याने मोफत दिल्यास ती राज्यातील रस्ते बांधणीसाठीच वापरता येईल आणि त्यामुळे बांधकामाची किंमत खाली आणणे शक्य होईल, असे सांगितले. या सूचनेचे स्वागत करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही सूचना आम्हाला मान्य असून, तसा जीआर लवकरच काढण्यात येईल.
राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण
महाराष्ट्रात ५२00 किलोमीटर्सचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. तीन वर्षांत राज्यात त्यांची लांबी २२ हजार किलोमीटर्स पर्यंत वाढवण्याचा परिवहन मंत्रालयाचा इरादा आहे. राज्याला पूर्वी अवघी ५0 कोटींची रक्कम सीएसआरच्या रूपात मिळत असे. ती आता ६ हजार कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. भूसंपादन लवकर केल्यास आम्ही रस्तेबांधणी वेगाने करू, असे गडकरी म्हणाले.
कोकणात २२ पैकी १९ सागरी पूल आपल्या काळात बांधल्याचे नमूद करीत गडकरींनी उर्वरित ३ पुलांच्या कामांना गती देण्याबाबत सुचवले. त्नद्यांवर जिथे पूल बांधाल, त्या पुलांच्या खाली बंधारे अवश्य बांधल्यास पाणी अडवता येईल
असेही गडकरी म्हणाले. पर्यावरण, वन विभाग यांच्या ना हरकत प्रमाणपत्रांमुळे रस्त्यांचे जे प्रकल्प अडकले आहेत, त्याच्या मंजुऱ्यांची प्रक्रिया लवकर आटोपण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
वाढदिवसाची भेट
गडकरींनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. त्याचबरोबर इंदापूर पनवेल या रखडलेल्या रस्ता प्रकल्पासाठी, स्टेट बँकेने ५६0 कोटींचा निधी मंजूर केल्याचे गडकरींनी फडणवीसांना सांगितले आणि ही वाढदिवसाची खास भेट असल्याचे नमूद केले.
>मुंबई ते गोवा सागर तीरावर नवा महामार्ग
अमेरिका दौऱ्यातील निरीक्षणाचा संदर्भ देत गडकरी यांनी पॅसिफिक महासागराच्या तीरावरून लॉस एंजलिस ते सॅन फॅ्रन्सिस्को मार्गाचा उल्लेख केला. कोकणात विस्तीर्ण किनारा आहे. मुंबई ते गोवा असाच सुंदर महामार्ग आपण तयार केला आणि त्यावर सुंदर ठिकाणे विकसित केली तर पर्यटकांना सागर तीराचा आनंदही घेता येईल.

Web Title: Two lakh crores road in three years in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.