दोन लाख भाडे, तरीही हेलिकॉप्टरच हवे; हेलिकॉप्टरच्या मागणीत ४० टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:24 AM2024-04-15T11:24:00+5:302024-04-15T11:24:43+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे देशभर दौरे सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे देशभर दौरे सुरू आहेत. त्यामुळे चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टरची मागणी ४० टक्क्यांनी वाढली असून, ही सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना १५ ते २० टक्के अधिक उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. मागणीत वाढ झाल्यामुळे चार्टर्ड सेवांचे प्रतितास दरही वाढले आहेत. विमानासाठी आता ४.५ ते ५.२५ लाख रुपये, तर दोन इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी १.५ ते १.७ लाख रुपये आकारले जात आहेत, असे या व्यवसायाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
सामान्य काळ, तसेच मागील निवडणुकांच्या तुलनेमध्ये यावेळी चार्टर्ड विमान व हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे. विमाने व हेलिकॉप्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. काही सेवा पुरवठादार ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांकडून चालक दलासह विमान व हेलिकॉप्टर किरायाने घेऊ इच्छित आहेत. राजकीय पक्ष आपले उमेदवार आणि नेत्यांना विविध ठिकाणी, विशेष करून दुर्गम भागात कमी वेळेत पोहोचता यावे म्हणून हेलिकॉप्टरचा उपयोग करतात.
यूपीसारख्या मोठ्या राज्यांत हेलिकॉप्टरचा अधिक उपयोग
‘हेलिकॉप्टरची मागणी वाढत असून, ती सामान्य काळाच्या तुलनेत निवडणूक काळात २५ टक्क्यांनी अधिक आहे. तथापि, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे, असे रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे (आरडब्ल्यूएसआय) अध्यक्ष (पश्चिम क्षेत्र) कॅप्टन उदय गेली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. सामान्यपणे राजकीय पक्ष आपले उमेदवार आणि नेत्यांना विविध ठिकाणी, विशेष करून दुर्गम भागात कमी वेळेत पोहोचता यावे म्हणून हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. उत्तर प्रदेश (यूपी), पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत हेलिकॉप्टरचा उपयोग अधिक होताना दिसत आहे, असे गेली म्हणाले. चार्टर्ड विमानांची मागणी मागील सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहे, असे बिझनेस एअरक्रॉफ्ट ऑपरेटर्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन आर. के. बाली यांनी सांगितले.