भुरट्या चोरांचा उच्छाद, वर्षभरात रेल्वेतून चोरीस गेले दोन लाख टॉवेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 01:09 PM2018-10-04T13:09:53+5:302018-10-04T13:11:42+5:30
रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे.
मुंबई - रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे. गेल्या आर्थिक वर्षात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सुमारे एक लाख 95 हजार टॉवेल चोरीस गेली आहेत. इतकेच नाहीतर 81 हजार 736 चादरी, 55 हजार 573 उशांची कव्हरे, 5 हजार 038 उशा आणि 7 हजार 043 पांघरुणांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून चोरीस जाणाऱ्या सामानामध्ये 200 टॉयलेट मग, एक हजार टेप आणि 300 हून अधिक फ्लश पाइपचाही समावेश आहे. सोमवारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात रतलामला जाणाऱ्या एका व्यक्तीला 3 पांघरुणे, 6 चादरी आणि तीन उशा चोरल्याच्या आरोपाथाली अटक करण्यात आली होती.
दरम्यान, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात रेल्वेमधून 79 हजार 350 टॉवेल, 27 हजार 545 चादरी, 21 हजार 50 उशांची कव्हरे 2 हजार 150 उशा आणि 2 हजार 65 पांघरुणे चोरीस गेली आहेत. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल 62 लाख रुपये एवढी आहे.
गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये रेल्वेला सुमारे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रेल्वेत होणाऱ्या किरकोळ चोऱ्यांमुळे झाले आहे. रेल्वेतून चादरी आणि अन्य वस्तूंच्या चोरीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोच अटेंडेंटला करावी लागते, तर बाथरूममधील सामानाच्या नुकसानीची भरपाई रेल्वे करते.
रेल्वेत वापरण्यात येणाऱ्या बेडशीटची किंमत 132 रुपये, टॉवेल 22 रुपये आणि उशीची किंमत 25 रुपये असते. मात्र प्रवाशांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या वस्तू पुन्हा रेल्वेकडे येत नाहीत.सेंसर टेप आणि सीसीटीव्हीसारख्या सुविधा उपलब्ध असूनही वस्तू चोरीस जातात.