कर्नाटकातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, कुमारस्वामींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:48 AM2018-07-06T05:48:57+5:302018-07-06T05:48:57+5:30
कर्नाटकात सरकार स्थापन करताच शेतक-यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पूर्ण केले आहे. विधानसभेत गुरुवारी २0१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूदही करीत असल्याचे जाहीर केले.
बंगळुरू : कर्नाटकात सरकार स्थापन करताच शेतक-यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पूर्ण केले आहे. विधानसभेत गुरुवारी २0१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूदही करीत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी इंधन, वीज व मद्य यावरील करात वाढ केली आहे.
या निर्णयानुसार शेतक-यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शेतक-यांचे २0१७ पर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत असल्याचे एच.डी. कुमारस्वामी यांनी घोषित केले. ज्या शेतक-यांनी घेतलेले सारे कर्ज फेडले आहे, त्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहेत. तसेच सर्व शेतक-यांना कर्ज माफ झाल्याचे दाखले लगेच दिले जातील. त्यामुळे त्यांचा नवे कर्ज घेण्याचा मार्ग खुला होईल, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प मांडण्याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी टिष्ट्वट करून, शेतकºयांना तसेच सर्वसामान्यांना काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
राज्यातील इंदिरा कँटीनला मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व जिल्हा आणि तालुक्यांत २४७ कँटीन उघडण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या कँटीनसाठी २११ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. तसेच आधीच्या सिद्धरामय्या सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना कायम राहतील, असेही कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कुमारस्वामी यांनी शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. ती करणे आपणास शक्य न झाल्यास आपण राजकारणातूनच निवृत्त होऊ , असेही ते म्हणाले होते. कर्जमाफीच्या दृष्टीनेच त्यांनी अर्थसंकल्पाची तयारी चालवली होती.
मात्र कुमारस्वामी यांनी संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडू नये, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे होते. त्यासाठी आपल्या समर्थक आमदारांमार्फत तशी मोहीमही राबवण्यास सुरुवात केली होती.
त्यातूनच सत्ताधारी काँग्रेस-जनता दल आघाडीत एकवाक्यता नाही, दोन्ही पक्षांचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. याही पुढे जात भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी या नाराज आमदारांशी संपर्क साधा, अशा सूचना आपल्या आमदारांना दिल्या होत्या. पण राहुल गांधी आणि कुमारस्वामी यांच्यातील चर्चेनंतर या सर्वच चर्चा थांबल्या. (वृत्तसंस्था)
इंधन व दारूच्या दरात दणदणीत दरवाढ
शेतकºयांना कर्जमाफी देतानाच कुमारस्वामी यांनी पेट्रोल, डिझेल तसेच विजेच्या दरात वाढ करीत असल्याची घोषणा करून सामान्यांना धक्काच दिला. तसेच दारूवरील करातही कर्नाटक सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात लीटरमागे १.१४ रुपये तर डिझेलच्या दरात १.२० रुपये वाढ होणार आहे. म्हणजे पेट्रोलच्या दरात ३० ते ३२ तर डिझेलच्या दरात १९ ते २० टक्के वाढ होईल.