लालूंची तुरूंगात सेवा करण्यासाठी दोन सहाय्यकांनी खोट्या प्रकरणात स्वतःला केलं सरेंडर, पोलिसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 10:40 AM2018-01-10T10:40:32+5:302018-01-10T13:24:18+5:30
चारा घोटाळाप्रकरणात तुरूंगांत शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सेवा करण्यासाठी दोन सहाय्यक तुरूंगाच पोहचले आहेत.
रांची- चारा घोटाळाप्रकरणात तुरूंगांत शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सेवा करण्यासाठी दोन सहाय्यक तुरूंगाच पोहचले आहेत. या दोन साहाय्यकांनी एका खोट्या प्रकरणात स्वतःला पोलिसांकडे सरेंडर केलं. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने लालूंना दोषी ठरविल्याच्या दिवशीच या दोघांनी एका खोट्या प्रकरणात स्वतःला सरेंडर केलं. पोलिसांनी हा दावा केला असून सध्या या प्रकरणाची चौकशी केली जाते आहे.
या दोघांपैकी एकाचं नाव मदन यादव असून तो दोन गोशाळा, एक घर व एका एसयुव्ही गाडीचा मालक आहे. रांची चे राहणारे मदन यादव हे सुमित यादव नावाच्या व्यक्तीकडून दहा हजार रूपये हिसकावून घेण्याच्या आरोपात बिरसा मुंडा तुरूंगात आहेत. या प्रकरणात त्यांचा मित्र लक्ष्मण यादव यांनी मदत केल्याचा दावा त्यांनी केला आहे. लक्ष्मण यादवही सध्या या कथित प्रकरणात बिरसा मुंडा तुरूंगात आहे. दरम्यान, राजद या दोघांना लालूंचं सहाय्यक न मानता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं सांगत आहे.
मदन यादव व लक्ष्मण यादव तुरूंगात कसे गेले? या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करायला हवी. लालूंनी कधीही कुणालाही तुरूंगात जायला सांगितलं नव्हतं, असं राजदचे प्रवक्ते शक्ति सिंह यांनी म्हंटलं.
पोलिसांच्या दाव्यामुळे बनतिये एक रंजक कहाणी
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सुमित नावाच्या व्यक्तीने 23 डिसेंबर रोजी मदन आणि लक्ष्णच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पण त्यावेळी पोलिसांना कुठलाही संशय आला नाही. याच दिवशी लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यासाठी दोषी ठरविण्यात आलं. विशेष म्हणजे त्याच दिवशी मदन व लक्ष्मण या दोन आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये सरेंडकर केलं. त्या दोघांनी बिरसा मुंडा तुरूंगात पाठविण्यात आलं.
गावातून अचानक मदन गायब झाल्यावर तेथिल लोकांना संशय आला. मदनला ओळखणाऱ्या एका चहा विक्रेत्याने सांगितलं की, मदनची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. त्यांना चोरी किंवा कुणाकडून पैसे हिसकावून घेण्याची काहीही गरज नाही. मदन निश्चितपणे लालूंची सेवा करायला तुरूंगात गेले, असंही चहा विक्रेते मनोज कुमार यांनी म्हंटलं.
मदन यादव हे लालू प्रसाद यादव यांच्या चांगले ओळखीचे असल्याची माहिती पोलिसांना समजली. लालू जेव्हा रांचीमध्ये यायचे तेव्हा मदन त्यांची सेवा करायचे. या माहितीनंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मदनचे मित्र लक्ष्मण यांनीसुद्धा याआधी लालूंसाठी स्वयंपाकी म्हणून काम केलं आहे. पोलिसांकडून आता 23 डिसेंबर रोजी नेमकं काय घडलं ? याचा तपास केला जातो आहे.