सूत जुळलं! 2 बहिणींचं प्रेम जडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं, पळून जाऊन लग्न केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 06:31 PM2022-05-16T18:31:36+5:302022-05-16T18:38:43+5:30
घरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मंदिरात लग्न झाले. पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अनेकांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकले आहेत. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. दोन बहिणी या एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि त्यानंतर घरातून पळून जाऊन त्यांनी लग्न केल्याची घटना घडली आहे. घरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मंदिरात लग्न झाले. पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात दोन्ही मुलींना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील दनकौर भागातील एका गावातील एक मुलगी 20 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. अनेक दिवस घरच्यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यानंतर कोतवालीमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दुसरीकडे त्याच दिवशी दिल्लीतील आंबेडकर नगर पोलीस स्टेशन परिसरातून आणखी एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी आंबेडकरनगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.
आंबेडकर नगर येथील बेपत्ता मुलगी ही दानकौर येथील गावातील बेपत्ता मुलीच्या मामाची मुलगी आहे. दोघींच लग्न दिल्लीतील मंदिरात झाले. दिल्ली पोलीस आणि दनकौर पोलीस या दोन्ही बेपत्ता मुलींचा बराच वेळ शोध घेत होते, मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. लग्नानंतर दोन्ही मुली दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होत्या. तपासादरम्यान दनकौर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. तिने नववधूचा ड्रेस घातला होता आणि तिच्यासोबत राहणारी दुसरी तरुणी नवरदेवाच्या रूपात आढळली. दोघींनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी स्वखुशीने एकमेकींशी लग्न केले असून त्यांना एकमेकांसोबत राहायचे आहे.
दोन्ही मुलींचे नातेवाईक कोतवालीत येऊन त्यांना समजावत राहिले, मात्र त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. मुलींच्या वागण्यामुळे दोघांचे कुटुंबीय आपापसात भांडतानाही दिसले. त्याच वेळी, दोन्ही मुलींनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही प्रौढ आहोत आणि एकमेकांसोबत राहू इच्छितो. दनकौर कोतवालीचे इन्स्पेक्टर राधा रमण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली समलैंगिक आहेत, त्यांचे लग्न झाले आहे. दोघीही प्रौढ आहेत आणि एकमेकांसोबत स्वतःच्या इच्छेने जगू इच्छितात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.