१२ वर्षीय मुलीचा ३५ वर्षीय तरुणाशी लग्नासाठी सौदा; मुलगा आणि दलालाला घातल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:42 PM2022-11-30T18:42:03+5:302022-11-30T18:46:55+5:30
बिहारमधील अररियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : एकीकडे देशात बालविवाहाबाबत कायदा करण्यात आला आहे, तर दुसरीकडे बिहारमधील अररियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे एका अल्पवयीन मुलीचे वयस्कर मुलाशी लग्न करण्यात आले. या लग्नाचा सौदा झाला असल्याचे सांगितले जात आहे. हा धक्कादायक प्रकार बिहारमधील अररियाच्या राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील हासा गावात घडला आहे. जिथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह बेतिया येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय रामबाबू यादवसोबत करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, राणीगंजच्या हासा गावातील जीवन मंडल या दलालाने अल्पवयीन मुलीच्या आईला आमिष दाखवून बेतिया जिल्ह्यातील शिकारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ३५ वर्षीय रामबाबू यादवसोबत तिचे लग्न लावून दिले. यादरम्यान पोलिसांना हासा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच राणीगंज पोलिसांनी हासा गावात पोहोचून अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा कट रचणाऱ्या आशा या गावातील दलाल जीवन मंडल आणि रामबाबू यादव याला अटक केली आहे.
तरूण आणि दलालाला केली अटक
मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, जीवन मंडल या दलालाने बाहेरून मुले आणून गावातील लोकांना पैशाचे आमिष दाखवून अनेक विवाह केले आहेत. पोलीस स्टेशनचे अधिकारी कौशल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी वयस्कर रामबाबू यादव आणि दलाल जीवन मंडल यांना अटक करण्यात आली, जे अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावत होते. आता ते अटकेत असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"