श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार; हिंसाचार उफाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 08:32 AM2018-12-09T08:32:39+5:302018-12-09T08:33:01+5:30
शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता लाल चौकापासून 15 किमी दूरवरील मुजगुंड मलूरा भागात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
श्रीनगर : श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत मोठी चकमक सुरु असून भारतीय जवानंनी एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर या चकमकीवेळी पाच जवान जखमी झाले आहेत. चकमकीवेळी दहशतवादी लपलेल्या घराला आग लागली. या घरासह चार घरे नेस्तनाभूत झाली आहेत.
अधिकाऱ्यांना सांगितले की, शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता लाल चौकापासून 15 किमी दूरवरील मुजगुंड मलूरा भागात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसराला घेराव घातला. यावेळी चाललेल्या शोधावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर जोरदार गोळाबार करण्यात आला.
#UPDATE: Mobile internet services have been suspended in Srinagar following the Mujgund encounter which is underway there since yesterday. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) December 9, 2018
दहशतवादी शेख हमजा शाळेजवळील एका घरामध्ये लपले होते. या गोळीबारात सीआरपीएफ आणि पोलिसांचे दोन जवान जखमी झाले. यानंतर एका तासाच्या चकमकीनंतर एका दहशतवाद्याला मारण्यात यश आले. नंतरच्या तासाभरात आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ही चकमक आजही सुरुच असून खबरदारी म्हणून इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
मुजगुंडमध्ये चकमकीची बातमी पसरताच एचएमटी, पंरपोरा, मलूरा, लावेपोरा आणि अन्य भागांमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी रस्त्यावर उतरत दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी या युवकांनी भारत विरोधी आणि जिहादी घोषणा दिल्या. सुरक्षादलांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमारही केला. पॅलेट गनच्या माऱ्यात 5 आंदोलक जखमी झाले आहेत.