सीमारेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत 2 जवान जखमी
By Admin | Published: June 8, 2017 10:30 AM2017-06-08T10:30:41+5:302017-06-08T10:49:35+5:30
जम्मू काश्मीरमधील उरी परिसरात पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा घुसरखोरीचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 8 - जम्मू काश्मीरमधील उरी परिसरात पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा घुसरखोरीचा प्रयत्न करण्यात आले आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, आताही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. याआधी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टर परिसरात भारतीय लष्कराने घुसखोरीचा मोठा कट उधळत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
श्रीनगर येथे लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी सांगितले की, ""मंगळवारी रात्री दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गस्तीवरील जवानांनी पाहिले. त्यानंतर जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात कारवाईस सुरुवात केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या कारवाईत हे दहशतवादी मारले गेले.""
ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे जीपीएस यंत्रणाही आढळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये 5 ते 6 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. तर दुसरीकडे बुधवारी रात्री शोपिया सेक्टरमध्ये दगडफेक झाल्यानं सुरक्षा रक्षकांचं वाहन उलटलं, ज्यात 12 सीआरपीएफचे जवान जखमी झाले. दरम्यान, प्राथमिक उपचारानंतर सर्व जवानांना सोडण्यात आले आहे.
यापूर्वी दहशतवाद्यांनी उरीमधील लष्करी छावणीवर हल्ला केला होता, या भ्याड हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. या भ्याड हल्लाचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले होते.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कधी घुसखोरी तर कधी शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण होत आहे. या सर्व घटनांमुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंधही ताणले गेले आहेत.
दरम्यान, लष्कराने गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यात अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बंदीपोरामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
J&K: Two jawans injured in an encounter along LoC in Uri after 5-6 terrorists tried to infiltrate (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/63DXHJaupG
— ANI (@ANI_news) June 8, 2017