अकाली दलामधून दोन आमदार निलंबित
By Admin | Published: July 21, 2016 04:43 AM2016-07-21T04:43:08+5:302016-07-21T04:43:08+5:30
आम्हाला लक्ष्य करण्यात आले, असा आरोप शिरोमणी अकाली दलातून निलंबित करण्यात आलेले आमदारद्वय परगतसिंग व इंदरबिरसिंग बोलारिया यांनी बुधवारी केला
जालंधर : जनतेसाठी आवाज उठविल्यानेच आम्हाला लक्ष्य करण्यात आले, असा आरोप शिरोमणी अकाली दलातून निलंबित करण्यात आलेले आमदारद्वय परगतसिंग व इंदरबिरसिंग बोलारिया यांनी बुधवारी केला. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरून काल या दोघांना पक्षाने निलंबित केले होते.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्यामुळे हे दोघे आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तथापि, त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी आमदार नवज्योत कौर यादेखील भाजपातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत जालंधर छावणीचे आमदार आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार परगतसिंग तसेच अमृतसर दक्षिणचे आमदार इंदरबिरसिंग बोलारिया यांच्या निलंबनाची मंगळवारी घोषणा केली होती.
आपल्या निलंबनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना परगत म्हणाले की, लोकशाहीत सत्य बोलणे व मतदारसंघातील लोकांसाठी आवाज उठविणे या जर पक्षविरोधी कारवाया ठरत असतील, तर मी मान्य करतो की, मी त्या केल्या
आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकांचे मुद्दे मांडल्याबद्दल निलंबनाऐवजी मी बडतर्फीची प्रतीक्षा करीत होतो, असे बोलारिया म्हणाले. या दोघांनी आपापल्या मतदारसंघात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, आमच्या विनंतीकडे दुर्लक्ष
केले, असेही या आमदारद्वयांनी सांगितले.
माझ्या मतदारसंघातील प्रस्तावित घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प तार्किक व कायदेशीरदृृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य नसून, लोक त्याच्याविरुद्ध आहेत, असे परगत म्हणाले. (वृत्तसंस्था)
>पत्ते उघड करण्यास नकार
हे दोघेही आपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी त्यांचे पत्ते उघड करण्यास नकार दिला.
योग्यवेळ आल्यानंतर मी याबाबत (आपच्या मुद्यावर) बोलेन. ती वेळ येऊ द्या. योग्यवेळी मी प्रत्येक गोष्ट उघड करीन, असे परगत म्हणाले.