महाराष्ट्रातून आणखी दोन बुलेट ट्रेनचे प्रस्ताव; देशात एकूण सहा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:04 PM2020-01-30T17:04:01+5:302020-01-30T17:14:41+5:30
महाराष्ट्रातून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद प्रकल्प रखडला आहे.
नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन जेव्हा धावेल तेव्हा धावेल, पण रेल्वेने देशभरात आणखी सहा बुलेट ट्रेन मार्गासाठी तयारी सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात दोन प्रस्ताव आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी याची माहिती दिली आहे. या मार्गांपैकी सर्वात मोठा मार्ग दिल्ली-जयपुर-उदयपुर-अहमदाबाद असा असून याची लांबी 886 किमी आहे. तर दुसरा मोठा मार्ग दिल्ली-ग्रेटर नोएडा-आगरा-लखनऊ-वाराणसी असा असून याची लांबी 865 किमी आहे. दिल्ली-चंडीगढ़-लुधियाना-जालंधर-अमृतसर असा 459 किलोमीटर आहे.
महाराष्ट्रातून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद प्रकल्प रखडला आहे. तरीही रेल्वेने आणखी दोन मार्ग आखले आहेत. यामध्ये एक महाराष्ट्रातच तर दुसरा महाराष्ट्राबाहेर जाणारा आहे. मुंबई-नाशिक-नागपूर असा बुलेटट्रेनचा मार्ग असणार असून लांबी 753 किलोमीटर आहे. मुंबई-हैदराबाद असा दुसरा मार्ग असून हा 711 किमी लांबीचा आहे. तर सहावा मार्ग चेन्नई-बेंगळुरू-म्हैसूर असा असून 435 किलोमीटर आहे.
या मार्गांची आखणी सुरू झाली असून याचा अहवाल एक वर्षात देण्यात येणार आहे. या मार्गांवर जमीन कशी उपलब्ध होईल, काय समस्या येतील, भाडे किती असेल आदी विचारात घेतला जाणार आहे.