पठाणकोट हवाई दलाच्या तळावर आणखी २ दहशतवादी, कारवाई अंतिम टप्प्यात
By admin | Published: January 4, 2016 12:53 PM2016-01-04T12:53:44+5:302016-01-04T15:19:39+5:30
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर आणखी २ दहशतवादी लपले असून ही कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. ४ - गेल्या तीन दिवसांपासून पठाणकोट हवाई तळावर सुरू असलेली चकमक अंतिम टप्प्यात आली असून अद्याप तेथे २ दहशतवादी लपल्याची माहिती एनएसजीच्या अधिका-यांनी दिली.
सोमवारी दुपारी एनएसजी आणि हवाई दलाच्या अधिका-यांनी एअरबेसमध्ये पत्रकारपरिषद घेऊन सुरु असलेल्या कारवाई संदर्भात माहिती दिली. एअरबेसवरील हवाई दलाचे कर्मचारी रहात असलेल्या एका इमारतीमध्ये हे अतिरेकी लपले असून, तिथे त्यांना घेरण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. मात्र एअरबेसवरील सर्व कर्मचा-यांचे कुटुंबीय सुखरूप असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पठाणकोट हवाई दलाच्या अतिरेकी आणि सुरक्षापथकांमध्ये चकमक सुरु झाली. शनिवारी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर मोहिम फत्ते झाली असा समज झाला होता. मात्र संध्यकाळी शोधमोहिम सुरू असतानाच आणखी काही दहशतवादी लपले असल्याचे समोर आले आणि पुन्हा चकमक सुरु झाली. आतापर्यंत ५ दहशतवादी ठार झाले असून अद्याप २ जण लपले आहेत. या कारवाईत आत्तापर्यंत ७ जवान शहीद झाले, त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याकत आले.
पत्रकारपरिषदेतील महत्वाचे मुद्दे:
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर सुरु असलेली मोहिम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत पाच अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून, अजून दोघांविरोधात कारवाई सुरु आहे
पठाणकोट येथील हवाई दल तळाच्या आतमध्ये रहाणारी सर्व कुटुंब सुरक्षित आहेत
पठाणकोट येथील हवाई दल तळाचा परिसर खूप मोठा आहे, शोधमोहिम सुरु आहे, अजून बराचवेळ शोध मोहिम सुरु रहाण्याची शक्यता असून संपूर्ण परिसर पिंजून काढल्याशिवाय कारवाई संपल्याची घोषणा शक्य नाही
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरील अतिरेक्यांविरोधात एनएसजी आणि गरुडा कमांडो संयुक्तपणे कारवाई करत आहेत.
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरील विमानांना लक्ष्य करण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता मात्र सर्व विमाने सुरक्षित आहेत