गायी चोरल्याचा संशय, जमावाच्या जबर मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 05:37 PM2017-08-27T17:37:00+5:302017-08-27T17:41:18+5:30
मुस्लिम तरूणांना गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे.
जलीपैगुडी, दि. 27 - मुस्लिम तरूणांना गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालच्या जलीपैगुडी जिल्ह्यातील धुपगुरी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत हफीझुल शेख आणि अन्वर हुसैन या दोघांचा मृत्यू झाला. जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीनंतर दोघांना रूग्णालयात नेण्यात आले होते, पण मात्र उपचार सुरू करण्यात आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हफीझुल आणि अन्वर हे दोघे एका पिक अप व्हॅनमधून प्रवास करत होते.या व्हॅनमध्ये सात गायी होत्या, व्हॅनच्या ड्रायव्हरला रस्ता सापडला नाही म्हणून त्याने ही व्हॅन धुपगुरी गावाजवळ आणली तर गाडीतील गाडी पाहून गावकऱ्यांनी गोंधळ घातला.
गावकऱ्यांच्या गोंधळामुळे ड्रायव्हरने गाडी अजून वेगात पळवायचा प्रय़त्न केला पण गावक-यांनी रस्ता अडवून गाडी थांबवली. दरम्यान चालकाने उडू मारून घटनास्थळावरून पळ काढला. पण अन्वर आणि हफीझुल या दोघांना गावकऱ्यांनी पकडले आणि गाय चोरणारे चोर असल्याच्या संशयावरून जबर मारहाण केली.
हे दोघेही चोर आहेत की नाही याची खात्री अद्याप पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांनी व्हॅनमध्ये असलेल्या गायी खरेदी केल्या असाव्यात आणि ते दोघेही व्यापारी असावेत अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.