छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 03:42 PM2019-11-05T15:42:17+5:302019-11-05T15:57:03+5:30
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. परिसरात आणखी काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील कटेकल्याण येथे मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी चकमक झाली. डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) चे पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखाचे बक्षिस असल्याची माहिती मिळत आहे.
Chhattisgarh: Two naxals killed in encounter between naxals and a team of District Reserve Guard (DRG) in Dantewada district's Katekalyan's, today morning.
— ANI (@ANI) November 5, 2019
गडचिरोलीतील कोरची तालुक्यात ग्यारापत्ती जंगल परिसरात रविवारी (15 सप्टेंबर) चकमक झाली होती. पोलिसांच्या सी-60 पथकातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास ही चकमक घडली. ग्यारापत्ती जंगल परिसरात सी - 60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकानेही नक्षलवाद्यांत्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत काही नक्षली ठार तर काही जखमी झाल्याची माहिती मिळाली होती.
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे काही दिवसांपूर्वी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी (24 ऑगस्ट) चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नारायणपूर जिल्ह्यामध्ये सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले होते. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते. या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस व सीएएफची पार्टी रवाना झाली. नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर सात नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली होती. या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले होते.