केंद्रात राज्यातून दोन नवे चेहरे?

By Admin | Published: January 16, 2015 06:32 AM2015-01-16T06:32:56+5:302015-01-16T07:03:16+5:30

महाराष्ट्राला जादा प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार आणि खांदेपालट केला जाण्याची शक्यता आहे.

Two new faces in the state at the Center? | केंद्रात राज्यातून दोन नवे चेहरे?

केंद्रात राज्यातून दोन नवे चेहरे?

googlenewsNext

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
महाराष्ट्राला जादा प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार आणि खांदेपालट केला जाण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपाच्या आणखी एका लोकसभा सदस्याचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे पंतप्रधान कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करणे आवश्यक झाले आहे. दानवे हे ग्र्राहक कामकाज आणि अन्न खात्याचे राज्यमंत्री होते. दानवेंच्या जागी वर्णी लागू शकणाऱ्यांमध्ये दिंडोरीचे लोकसभा सदस्य हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह अन्य काहींची नावे चर्चेत आहेत.
याआधी ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्या वेळी अनिल देसाई यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, असे वाटले होते. परंतु शिवसेनेसोबत निर्माण झालेल्या काही गैरसमजामुळे त्यांना थांबविण्यात आले होते. आता हा वाद मिटला आहे. त्यामुळे देसाई यांना मंत्रिमंडळात सामील करण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे.
अन्य राज्यांमधूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे. या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किमान ६ मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालतील, असे बोलले जाते. मात्र या वेळी कोणत्याही मंत्र्याला
डच्चू द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला यांना राज्यपाल बनविले जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता नव्या मंत्र्यांचा शपथविधी येत्या शनिवारी अथवा पुढील आठवड्याच्या प्रारंभी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Two new faces in the state at the Center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.