नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा हल्ला उधळला, बॅटच्या दोन कमांडोंना कंठस्नान, भारताचा एक जवान हुतात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 09:10 PM2019-12-17T21:10:06+5:302019-12-17T21:10:35+5:30
पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळपासून पुंछमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये बॅटच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू होता.
श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याच्या बॉर्डन अॅक्शन टीमने (बॅट) केलेल्या भ्याड हल्ला नियंत्रण रेषेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. या कारवाईत पाकिस्तानी सैन्यातील स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या दोन कमांडोंना कंठस्नान घालण्यात आले. तर भारताच्याही एका जवानाला हौतात्म आले आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळपासून पुंछमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये बॅटच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाकिस्तानने केलेला हा हल्ला परतवून लावण्यासाठी नियंत्रण रेषेवरील फॉरवर्ड पोस्टवर असलेल्या जवानांनी प्रत्युत्तरदाखल कारवाई सुरू केली. या कारवाईत पाकिस्तानच्या स्पेशन सर्व्हिस ग्रुपच्या दोन कमांडोंना ठार करण्यात आले. यादरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी कमांडोंनी सुंदरबनी विभागातील नाथुआ का टिब्बा या पोस्टवर हल्ला केला. या हल्ल्यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. मात्र या चकमकीवेळी भारतीय लष्कराचे रायफलमॅन सुखविंदर सिंह यांना हौतात्म्य आले.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने हल्ला केलेली नाथुआ का टिब्बा ही चौकी तीन बाजूंनी पाकिस्तानी पोस्टनी वेढलेली आहे. पाकिस्तानने यापूर्वीही या चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.