15 लाख रुपयांचे दोन पोपट चोरीला; शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:09 PM2022-11-22T21:09:56+5:302022-11-22T21:10:23+5:30
सुरतमध्ये परदेशी प्रजातीचे पोपट चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सूरत: गुजरातच्या सुरतमध्ये चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. परदेशी प्रजातीचे दोन पोपट चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या दोन्ही पोपटांची किंमत तब्बल 15 लाख रुपये असल्याचे पोपटाच्या मालकाने सांगितली आहे. मात्र, पोपटांची किंमत केवळ दोन लाख रुपये इतकी नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्रकरण जहांगीरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरियाव भागातील आहे. दोन मौल्यवान पोपटांच्या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दोन पोपटांपैकी एक नर आणि दुसरा मादी पोपट आहे. खोलीच्या छतावरील जाळी तोडून अज्ञातांनी चोरी केली होती. पोपट चोरीची ही घटना दिवाळीच्या दोन दिवसांनी घडली. याप्रकरणी 19 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बभ
बर्ड फार्मचे मालक विशाल भाई पटेल म्हणाले, ते 2007 पासून त्यांच्या फार्ममध्ये पक्षी प्रजनन करत आहेत. स्कार्लेट मॅकॉ डिसेंबर 2013 मध्ये कलकत्ता येथे राहणाऱ्या मित्राकडून विकत घेतले होते. या पोपटांचे वय 10 वर्षे आहे. दोन्ही पोपटांवर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतात. पोपट चोरीला गेल्यानंतर त्यांनी पोलीस मित्रासह 15 दिवस शोध घेतला. मात्र, कोणतीही माहिती मिळाली नाही, यानंतर शनिवारी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.