शरीराचे दोन तुकडे होऊनही त्याने केले अवयव दान!
By admin | Published: February 18, 2016 06:36 AM2016-02-18T06:36:35+5:302016-02-18T06:36:35+5:30
रस्ते अपघातात शरीराचे दोन तुकडे झाल्याने एका तरुणाने तशाही अवस्थेत अवयवांचे दान करण्याची इच्छा व्यक्त करून पराकोटीच्या परोपकारी वृत्तीची प्रचीती दिली
बंगळुरू : रस्ते अपघातात शरीराचे दोन तुकडे झाल्याने एका तरुणाने तशाही अवस्थेत अवयवांचे दान करण्याची इच्छा व्यक्त करून पराकोटीच्या परोपकारी वृत्तीची प्रचीती दिली. डॉक्टरांनीही त्याचे दोन्ही डोळे गरजूंवर प्रत्यारोपण करण्यासाठी वेळीच काढून घेऊन त्याच्या अंतिम इच्छेचा यथोचित
आदर केला. या दोन डोळ्यांनी
किमान दोन अंधांना पुन्हा दृष्टीलाभ होऊ शकेल.
अवयव दानाच्या प्रत्यक्ष कृतीच्या बाबतीत मात्र सार्वत्रिक औदासिन्य दिसून येते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील या तरुणाने मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानाही प्रसंगावधान राखून दाखविलेले हे औदार्य एकूणच अवयवदानाच्या चळवळीस स्फूर्तिदायक आहे.
बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत नोकरी करणारा २३ वर्षांचा हरीश नंजप्पा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमकुरू जिल्ह्यातील गुब्बी या आपल्या मूळ गावी गेला होता. मंगळवारी सकाळी गावाहून बंगळुरूला परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर साखरेच्या पोत्यांनी भरलेला एक ट्रक मागून भरधाव आला व ओव्हरटेक करण्याच्या नादात हरीशच्या मोटारसायकलला ठोकरून पुढे
गेला. दोन्ही वाहने वेगात असल्याने
या धक्क्याने हरीश मोटारसायकलसह ट्रकच्या मागच्या चाकाखाली
आला. या अपघाताचा आघात
एवढा जबरदस्त होता की, हरीशच्या शरीराचे दोन तुकडे झाले. कमरेच्या खालचा भाग मोटारसायकलसह
एका ठिकाणी उडाला, तर कमरेच्या वरचा शरीराचा भाग कित्येक फूट दूर जाऊन पडला.
डोक्यावर हेल्मेट असल्याने डोक्याला मार लागला नाही व तशाही अवस्थेत हरीश शुद्धीवर होता. मागून येणारी काही वाहने तशीच पुढे निघून गेली. काही वेळाने इतर वाहनांमधील लोक कण्हणाऱ्या, विव्हळणाऱ्या हरीशला पाहून थांबले. महामार्गाचा तो पट्टा डोल रोड आहे. थांबलेल्या लोकांनी टोल कंत्राटदार कंपनीच्या आपत्कालीन सेवेच्या नंबरवर फोन केला. काही मिनिटांतच रुग्णवाहिका आली व हरीशला नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. दुर्दैवाने तेथे नेल्यावर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)