पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:31 AM2019-06-21T02:31:01+5:302019-06-21T02:31:40+5:30
तृणमूल काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष; संचारबंदी लागू
कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातल्या भातपारा येथे गुरुवारी झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. तृणमूल काँग्रेस व भाजपतील हिंसक संघर्षामुळे गेले अनेक दिवस होरपळून निघालेल्या या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भातपारामधील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता तिथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले होते. त्याचे पोलीस महासंचालक वीरेंद्रकुमार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी उद््घाटन होणार होते. त्याच्या काही तास आधी या परिसरात पुन्हा हिंसाचार उफाळला. भातपारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जण मरण पावल्याचा भाजपने केलेला आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे. जमावाला पांगविण्यासाठी फक्त अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, भातपारातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ तिथे जाणार आहे.
प. बंगालमधील एकेकाळच्या हिंसाचारग्रस्त जंगलमहल, दार्जिलिंगसारखी सध्या भातपाराची अवस्था झाली आहे. भातपारामध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प. बंगालचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव व अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. भातपारामध्ये १९ मे रोजी विधानसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली. तेव्हापासून या परिसरात तृणमूल काँग्रेस व भाजपत सातत्याने हिंसक संघर्ष होत आहे. गावठी बॉम्ब हल्ला प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
तृणमूलचा भाजपवर आरोप
भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात काही जण जखमी झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. या पक्षाचे भातपारातील नेता मदन मिश्रा यांनी सांगितले की, अर्जुन सिंह व त्याच्या साथीदारांनी हा हिंसाचार केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.