अमेथीत दोन राण्या येणार आमने-सामने
By admin | Published: January 25, 2017 12:52 AM2017-01-25T00:52:32+5:302017-01-25T00:52:32+5:30
अमेथीच्या राजघराण्याचे महाराज काँग्रेसचे राज्यसभा सदस्य संजयसिंग यांच्या दोन राण्या गरिमासिंग आणि अमिता (कुळकर्णी) सिंग यांच्यात वारसा हक्कावरून सुरू असलेला संघर्ष
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
अमेथीच्या राजघराण्याचे महाराज काँग्रेसचे राज्यसभा सदस्य संजयसिंग यांच्या दोन राण्या गरिमासिंग आणि अमिता (कुळकर्णी) सिंग यांच्यात वारसा हक्कावरून सुरू असलेला संघर्ष, आता विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यापर्यंत पोहोचला आहे. अमेथी मतदारसंघात भाजपने संजयसिंगांची पहिली पत्नी गरिमासिंग यांना उमेदवारी दिली तर दुसरी पत्नी अमितासिंग यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे. राजघराण्याच्या दोन राण्या परस्परासमोर उभ्या ठाकल्या मुळे यंदा अमेथीच्या हाय प्रोफाईल मतदारसंघात लक्षवेधी रंग भरले जाणार आहेत.
अमेथीत गरिमासिंग यांना उमेदवारी देउन भाजपने मास्टर स्ट्रोक खेळला आहे. निवडणुकीच्या राजकारणात पहिल्या राणीसाहेब गरिमा सिंग प्रथमच भाग्य आजमावित आहेत तर दुसऱ्या राणी अमितासिंग यांनी राज्याच्या विधानसभेत अमेथीचे अनेकदा प्रतिनिधित्व केले असून मंत्रिपदही भूषवले आहे.