२१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन
By admin | Published: April 17, 2016 03:08 AM2016-04-17T03:08:59+5:302016-04-17T03:08:59+5:30
फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना
- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) ग्रंथालयात कार्यरत विजय नितनवरे (वय ४५) यांनी निराश न होता सतत आपल्या भावाचा शोध सुरू ठेवला होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना त्यांचा भाऊ हंसराज मिळाला.
३५ वर्षांचा हंसराज पुण्याच्या दिघी येथे वास्तव्याला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून तो भोसरीमध्ये एका कंपनीत कामाला आहे.
विजय आणि हंसराज यांचे वडील पुरुषोत्तम नितनवरे वर्धेजवळील पुलगाव अॅम्युनेशन डेपोमध्ये कार्यरत होते.
१९८२ साली त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा सर्वात लहान मुलगा हंसराज अवघा एक वर्षांचा होता. चार वर्षांनंतर त्यांच्या जागी पत्नीला डेपोत काम मिळाले. पुढे २३ मार्च १९९६ रोजी त्यांचीही जीवनयात्रा संपली. तेव्हा हंसराज इयत्ता दहावीत होता. पोरकेपणाच्या दु:खाने मानसिकदृष्ट्या खचला होता. हुशार विद्यार्थी असल्यावरही तो अनुत्तीर्ण झाला. भाऊबहिणीकडून आपल्याला जिव्हाळा मिळणार नाही या विचाराने त्याने २५ मे १९९६ रोजी घर सोडले. दरम्यान नैराश्याने ग्रासलेल्या हंसराजने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण सुदैवाने एका इसमाने त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर स्वत:ला सावरत मुंबईत एका कंपनीत हेल्पर म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात घरातून पळून गेला असल्याने पुन्हा भावाबहिणीशी संपर्क करण्याचे धाडस त्याला झाले नाही. मुंबईत १० वर्षे राहून पुण्यात आला. तेथे लग्नही केले.
दुसरीकडे मोठा भाऊ विजय आपल्या धाकट्या भावाच्या शोधासाठी अहोरात्र परिश्रम घेत होता. पोलीस ठाण्यांच्या खेटा घातल्या. छायाचित्र प्रसिद्ध केले आणि मग गुगलवर सर्च सुरू केला. त्यानंतर फेसबुकवर हंसराज नावाच्या लोकांना शोधणे सुरू झाले आणि अखेर त्याला त्याचा भाऊ ‘हंसराज’ मिळाला. विजयने त्याला पुलगावचा संदर्भ दिला तेव्हा त्याने ‘भाऊ मला क्षमा कर’ असे उत्तर दिले.
या संदेशाने विजयच्या आशा पल्लवित झाल्या. त्याने फेसबुकवरच हंसराजच्या मित्रांशी संपर्क साधला. एक दिवस हंसराजने विजयला फोन केला आणि दोन भावांची पुन्हा भेट झाली.
आपला धाकटा भाऊ जा जगात नाही हे मन मानत नव्हते. त्यामुळे सातत्याने त्याचा शोध सुरू ठेवला. चमत्कारांबद्दल ऐकले आहे; पण आता त्यावर विश्वास बसला.
- विजय नितनवरे
घरातून पळून जाण्याची घोडचूक केल्यावर पुन्हा भावाबहिणीसमक्ष जाण्याचे धाडस होत नव्हते. त्यांनी मात्र मला शोधण्यासाठी जिवाचे रान केले. अनेक वर्षांच्या वियोगानंतर मी त्यांना भेटत असून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. - हंसराज नितनवरे