नक्षलवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:48 AM2019-10-05T04:48:12+5:302019-10-05T04:48:27+5:30
झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली.
- एस. पी. सिन्हा
रांची : झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यात एसटीएफचे दोन जवान शहीद झाले, तर अन्य काही जवानांना गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. विशेष पोलीस अधीक्षक अनीश गुप्ता, डीआयजी ए.व्ही. होमकरसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि सर्च आॅपरेशन सुरू आहे.
असे सांगण्यात येत आहे की, एका जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जवानाचा रांचीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मुख्यमंत्री रघुवर दास यांनी जवानांच्या धाडसाचे कौतुक करताना म्हटले आहे की, नक्षली आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहेत. त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दशम फॉल भागात नक्षली झोनल कमांडर महाराज प्रामाणिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी सूचना देऊनही खूपच कमी संख्येने जवानांना पाठविण्यात आले.या घटनेनंतर पोलीस महासंचालक कमलनयन चौबे हे मुख्यमंत्री रघुवर दास यांना भेटले. शहीद जवानांचे पार्थिव झारखंडच्या जगुआर मुख्यालयाकडे रवाना करण्यात आले.
एसटीएफच्या शहीद जवानांची नावे खंजन कुमार महतो आणि अखिलेश राम अशी आहेत. अखिलेश राम हे पलामू जिल्ह्याच्या लेस्लीगंजचे रहिवासी होते. खंजन कुमार महतो हे रांची जिल्ह्याच्या सोनाहातू पोलीस ठाण्यांतर्गतच्या चैनपूरचे रहिवासी होते. हे जवान झारखंडमध्ये तैनात होते. अखिलेश राम यांना तीन गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे.