Corona New Variant Omicron: देशवासियांना मोठा दिलासा; त्या दोन कोरोनाबाधितांना ओमीक्रॉनची नाही, डेल्टाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 03:58 PM2021-11-28T15:58:56+5:302021-11-28T16:11:57+5:30
Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आणि त्या देशाने काहीतरी पाप केल्यासारखे अन्य देश वागू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून भारतात दोन कोरोनाबाधित आले होते.
दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आणि त्या देशाने काहीतरी पाप केल्यासारखे अन्य देश वागू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध लागू झाले आहेत. नवा व्हेरिअंट गेल्या चार दिवसांत 11 देशांमध्ये पोहोचला आहे. अशावेळी आफ्रिकेहून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना असल्याचे समोर आल्याने भारतात हडकंप उडाला होता. परंतू, या दोघांनाही खतरनाक व्हेरिअंट ओमीक्रॉनची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या दोन्ही आफ्रिकन नागरिकांना दुसऱ्या लाटेला कारणीभूत असलेल्या डेल्टा व्हेरिअंटची लागण झाली आहे. आफ्रिकेतून बंगळुरुला आलेले दोन व्यक्ती 11 आणि 20 नोव्हेंबरला कोरोनाबाधित सापडले होते. याच काळात नव्या व्हेरिअंटने आफ्रिकेत हात पाय पसरण्यास सुरुवात केली होती. नव्या व्हेरिअंटची घोषणा होताच बंगळुरुच्या आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली होती. या दोघांचे पुन्हा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट आले आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून एकूण 94 लोक भारतात आले आहेत आणि त्यापैकी फक्त दोन लोकांमध्ये कोरोना विषाणूचे पूर्वीचे प्रकार आढळून आले आहेत. या दोघांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर रोजी WHO ने ओमिक्रॉन प्रकार प्रथम शोधला होता. यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि यूकेमध्येही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत.
ओमिक्रॉनच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सर्व परदेशी प्रवाशांसाठी विमानतळावर स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. यासोबतच केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठीही आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.