श्रीपाद नाईक यांच्यावर दोन शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:53 AM2021-01-13T03:53:08+5:302021-01-13T03:53:40+5:30
श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयात डीन डॉ. बांदेकर यांच्या देखरेखीखाली नाईक यांच्या खांद्यावर व अन्यत्र अशा दोन शस्त्रक्रिया केल्या गेल्या
पणजी : केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर मंगळवारी पहाटे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृतदेह गोव्यात आणला गेला आहे. गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
उत्तर गोव्याचे खासदार असलेल्या श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला उत्तर कर्नाटकातील अंकोला तालुक्यात सोमवारी रात्री आठ वाजता अपघात झाला. त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाला धडक दिली व त्याबरोबर गाडी उसळली व पडली.
श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयात डीन डॉ. बांदेकर यांच्या देखरेखीखाली नाईक यांच्या खांद्यावर व अन्यत्र अशा दोन शस्त्रक्रिया केल्या गेल्या. पहाटे तीन वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या जीवितास धोका नाही.
नाईक यांच्या पत्नीचे निधन झाले आहे हे नाईक यांना मंगळवारी सकाळपर्यंत तरी सांगितले गेले नाही. कारण श्रीपाद नाईक यांना तो धक्का ठरू शकतो. सापेर, रायबंदर येथे नाईक यांचे निवासस्थान आहे. तिथे त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक, साईश व योगेश असतील.
राजनाथसिंह यांच्याकडून प्रकृतीविषयी विचारणा
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या इस्पितळाला मंगळवारी भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा करून नाईक यांच्या आरोग्याविषयी विचारणा केली. बुधवारी दिल्लीहून एम्सचे डॉक्टर्स गोव्यात येणार आहेत. ते नाईक यांची प्रकृती पाहतील व मग त्यांना उपचारांसाठी दिल्लीला नेण्याबाबत निर्णय होणार आहे.
डॉ. घुमे यांचे निधन
श्रीपाद नाईक यांच्यासोबत वाहनात एकूण सहा माणसे होती. डॉ. दीपक घुमे हेही वाहनात होते. घुमे हे लातूर येथील आहेत. त्यांचे निधन झाले. सहापैकी दोघांचे मृत्यू झाले. वाहनचालक जखमी झाला. श्रीपाद नाईक यांच्या स्वीय सहायकाचे निधन झालेले नाही.