बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By admin | Published: June 21, 2017 10:24 AM2017-06-21T10:24:10+5:302017-06-21T11:01:10+5:30
जम्मू-काश्मिरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सोपोर, दि. 21- जम्मू-काश्मिरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. सोपोरमध्ये बुधवारी सकाळी दडून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसंच त्यांच्याकडून शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. गुलजार अहमद आणि बासित अशी या दोन दहशतवाद्यांची नावं असून ते दोघे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहेत.
सोपोरमध्ये काही दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरूच ठेवली आहे, अशी माहिती सुरक्षा दलाकडून मिळते आहे. "एएनआय’ वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. सोपोर आणि परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच लष्करानं संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे, अशीही माहिती मिळते आहे.