काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:00 AM2018-03-17T02:00:30+5:302018-03-17T02:00:30+5:30
भाजपाचे नेते अन्वर खान यांच्या सुरक्षा रक्षकाकडून शुक्रवारी त्याची सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
श्रीनगर : भाजपाचे नेते अन्वर खान यांच्या सुरक्षा रक्षकाकडून शुक्रवारी त्याची सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बालहामात हा प्रकार घडला. सुरक्षा जवानाची रायफल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांवर खान व पोलिसांनी गोळीबार केला. त्यात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले. सुरक्षा जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नसून त्यांच्याकडील शस्त्रे जप्त केली आहेत. या दहशतवाद्यांचा साथीदार पळाल्याचा संशय आहे. (वृत्तसंस्था)
६0 दहशतवादी हल्ले : काश्मीरमध्ये यंदा ६० दहशतवादी हल्ले झाले असून त्यामध्ये १५ सुरक्षा जवान शहीद झाले तर १७ दहशतवादी मारले गेले आहेत. एक जानेवारी ते ४ मार्चपर्यंतच्या कालावधीतील हे दहशतवादी हल्ले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ३९ हल्ले झाले होते. अडीच महिन्यांत सीमेपलीकडून घुसखोरीच्या १६ घटना घडल्या. एका घटनेत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर ४३२ वेळा व आंतरराष्ट्रीय सीमेवर २०१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या काळात पाकच्या गोळीबारात १२ नागरिक ठार व ५९ जण जखमी झाले.
>तेलंगणातील अतिरेकी
पुलवामात सुरक्षा दलांशी या आठवड्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी मुहम्मद तौफिक तेलंगणाचा रहिवासी आहे. मुहम्मद तौफिक मारला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या तेलंगणातील घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला. त्या दिवशी त्याचे पालक घर बंद करून बाहेर गेले होते. मुहम्मद तौफिकचे वडील मोहम्मद रझाक अणुऊर्जा खात्याच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये काम करतात.