काश्मिरात दोन दहशतवादी ठार, सोपोरमध्ये तणाव; घरामध्ये लपून बसले होते दोघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:13 AM2017-09-05T01:13:34+5:302017-09-05T01:14:04+5:30
काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर शहरात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्रीनगर : काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर शहरात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या भागात आणखी दहशतवादी लपले आहेत का, हे शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे.
सोपोर शहरातील शंकर गुंड ब्राथ भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाच्या जवानांनी तिथे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले, असे सांगण्यात आले.
दोन्ही अतिरेकी दोघे हिजबुल मुजाहिद्दिन या संघटनेचे सदस्य आहेत. परवेझ अहमद वणी व नईम अहमद नजर परवेझ हा गेली सात वर्षे अतिरेकी कृत्यांत सहभागी होता, तर नईम गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय होता. ते ज्या घरात लपले होते, ते पीरजादा बशीर अहमद शाह याचे होते. ते गोळीबारानंतर आगीत भस्मसात झाले आहे. (वृत्तसंस्था)
इंटरनेट बंद
दहशतवाद्यांना ठार केल्याचे वृत्त पसरताच सोपोर आणि आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी मोबाइल व इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली आहे. तिथे कडक बंदोबस्त आहे.