तब्बल दोन तृतीयांश भारतीयांना द्यावी लागते लाच
By admin | Published: March 7, 2017 08:12 PM2017-03-07T20:12:06+5:302017-03-07T20:41:03+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये लाचखोरी ही भारतातील गंभीर समस्या बनली आहे.लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे
Next
ऑनलाइन लोकमत
बर्लिन/नवी दिल्ली, दि. 7 - गेल्या काही वर्षांमध्ये लाचखोरी ही भारतातील गंभीर समस्या बनली आहे. साध्या सरकारी कचेरीपासून मोठमोठ्या सरकारी बाबूंपर्यंत अनेक ठिकाणी चहापानासाठी चिरीमिरी दिल्याविना काम होत नाही, याचा अनुभव सर्वसामान्यांना येत असतो. आता समोर आलेल्या एका सर्व्हेमधून आशिया पॅसिफिक देशांमध्ये लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील 69 टक्के नागरिकांना कधी ना कधी लाच द्यावी लागते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचारविरोधासाठी काम करणाऱ्या ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. सार्वजनिक सेवा सुविधा धेण्यासाठी तब्बल दोन तृतियांश भारतीयांना लाच द्यावी लागते, असे या सर्व्हेत म्हटले आहे. भारतातील 69 टक्के नागरिकांनी आपल्याला कधी ना कधी लाच द्यावी लागल्याचे सांगितले. तर व्हिएतनाममधील 65 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानमध्ये लाचखोरीचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. पाकिस्तानमधील 40 टक्के तर चीनमधील 26 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याची माहिती दिली.
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये लाचखोरीचे प्रमाण सर्वात कमी आहे. जपानमध्ये केवळ 0.2 टक्के लोकांनी आपणास लाचखोरीचा सामना करावा लागल्याचे सांगितले. तर दक्षिण कोरियामध्ये हा दर 3 टक्के एवढाच आहे. या सर्व्हेनुसार भारत लाचखोरीच्याबाबतीत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनंतर सातव्या स्थानी आहे.