केरळमधील दोन हजार तरुण इसिसमध्ये?
By admin | Published: August 10, 2016 04:36 AM2016-08-10T04:36:05+5:302016-08-10T04:36:05+5:30
धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसकडे अर्शीद कुरेशी आणि रिझवान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसकडे अर्शीद कुरेशी आणि रिझवान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागपाडा पोलीस ठाण्यातही कुरेशी आणि खानसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील अब्दुल कादेर यांचा मुलगा अश्फाक याला इसिसमध्ये सहभागी केल्याचा संशय कदार यांनी व्यक्त केला आहे. अन्य दोन हजार तरुणांचे धर्मांतर करून त्यांना इसिसमध्ये सहभागी करून घेण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार गुन्हे शाखा, एटीएस, सीआययूने तपास सुरू केला आहे.
अर्शीद कुरेशी व रिझवान खान यांना राज्य एटीएसच्या मदतीने केरळ एटीएसने अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे या दोघांविरोधात अनेक तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली होती. धर्मांतर आणि त्याकरिता ब्रेन वॉश करण्याचे बरेचसे काम हे दक्षिण मुंबईतून सुरू होते. त्या करिता डॉ. झाकिर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च अॅण्ड फाऊण्डेशन कार्यालयाचा देखील वापर होत होता. मुळचे केरळ येथील रहिवासी असलेले अब्दुल कदार (६०) हे पत्नी, मुलगा, सून आणि मुलीसोबत राहतात. त्यांचा मुलगा अश्फाक हा गेल्या दोन वर्षांपासून धर्मांतराच्या बाबत फोनवरून बोलत असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. केरळमध्ये तो कुरेशी, रिझवानसह हनिफ आणि अब्दुलच्या संपर्कात होता. यातील एक जण मौलवी असून, अर्शीद कुरेशीच्या सांगण्यावरूनच त्याने, केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात ब्रेन वॉशचे काम हाती घेतले होते. (प्रतिनिधी)