दोन हजारांच्या नोटांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:49 AM2017-07-21T01:49:06+5:302017-07-21T01:49:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या असल्या तरी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या असल्या तरी गेल्या काही दिवसांत या नोटांची चणचण भासू लागली आहे.
सर्वसामान्यांसाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अडचणीच्या ठरल्या होत्या. त्या हातात असतानाही ग्रामीण भागांत त्याचे सुटे मिळणे अवघड होत होते. पण गेल्या काही दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण घटले आहे. अगदी एटीएममधून पैसे काढतानाही दोन हजारांच्या नोटा मिळेनाशा झाल्या आहे. या नोटांच्या टंचाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, रिझर्व्ह बँकेनेच दोन हजार रुपयांच्या नोटा पुरविण्याचे प्रमाण कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठ्या रकमेच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाणीवपूर्वक दोन हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा घटवला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात स्टेट बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी नीरज व्यास यांनी सांगितले की, सध्या रिझर्व्ह बँकेकडून आम्हालाही मोठ्या मूल्याच्या नोटा म्हणून केवळ ५00 रुपयांच्या नोटाच मिळत आहेत.
ते म्हणाले की, दोन हजार रुपयांच्या नोटा केवळ खातेदारांकडून काउंटरवर जमा करण्यात येणाऱ्या चलनातून मिळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. एसबीआयचे देशभरात ५८ हजार एटीएम असून, त्यापैकी काही एटीएममधील दोन हजार रुपयांच्या कॅसेट्सना आता ५00 रुपयांच्या कॅसेटमध्ये रिकॅलिबरेट करण्यात आले आहे. त्यामुळे एटीएममध्ये जास्त रक्कम ठेवता येईल. मात्र याबाबत रिझर्व्ह बँकेकडे विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही. गेल्या वर्षी नोटाबंदीत एक हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्याने बाजारात चलनाची चणचण भासू नये, यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा आणण्यात आल्या होत्या. आता दोन हजार रुपयांची टंचाई भासू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ५00 रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरू आहे. व्यवहारातील मोठ्या मूल्याच्या नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने जाणीवपूर्वक दोन हजार रुपयांच्या नोटा कमी करून ५00 रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात आणण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. आता रिझर्व्ह बँकेकडून २00 रुपयांच्या नोटाही व्यवहारात आणल्या जाण्याची शक्यता आहे.
नव्या नोटा...
रिझर्व्ह बँकेने २0 रुपयांच्या नव्या नोटाही लवकरच बाजारात आणण्याचे ठरविले आहे. सध्याच्या नोटेप्रमाणेच ती असेल. तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
या नव्या नोटा एस मालिकेतील असतील. सध्या चलनात असलेल्या २0 रुपयांच्या नोटा आर मालिकेतील आहेत. या नोटांची छपाई सुरू झाली आहे.