एटीएममधून 100 ऐवजी निघाल्या दोन हजाराच्या नोटा
By admin | Published: January 18, 2017 04:24 PM2017-01-18T16:24:49+5:302017-01-18T16:24:49+5:30
बँकेत न जाता सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रोख रक्कम मिळवण्याची सोय असल्याने गेल्या काही वर्षांत एटीएम बऱ्यापैकी लोकप्रिय झाले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
टोंक (राजस्थान), दि 18 - बँकेत न जाता सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रोख रक्कम मिळवण्याची सोय असल्याने गेल्या काही वर्षांत एटीएम बऱ्यापैकी लोकप्रिय झाले आहेत. त्यातही नोटाबंदीनंतर एटीएमच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आपल्याला हव्या असलेल्या रकमेचा आकडा एटीएमवर टाइप केल्यावर तेवढी रक्कम काही क्षणांतच आपल्या हातात पडते, पण एटीएममधून हव्या असलेल्या रकमेपेक्षा कैक पटीनी अधिक रक्कम हातात पडली तर. अशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे.
राजस्थानमधील टोंक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एटीएममधून तांत्रिक समस्येमुळे 100 रुपयांऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा निघू लागल्या. एटीएमवर 100 रुपये टाइप केले तरी दोन हजार रुपये निघत होते. बघता बघता ही बातमी शहरभर पसरली आणि काही वेळातच लोकांनी या एटीएममधून सहा लाख रुपये काढले. या संदर्भातील वृत्त दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झाले आहे.
त्याचे झाले असे की, एटीएममध्ये वेगवेगळ्या नोटांसाठी वेगवेगळे कप्पे असतात, त्या प्रत्येक कप्प्याचा नोटांच्या मूल्यानुसार ठरावीक संकेतांक असतो. त्या संकेतांकानुसार एटीएममधून नोटांचे वितरण होत असते. त्यामुळे समजा दोन हजार रुपयांच्या नोटा चुकून 100च्या नोटांच्या कप्प्यात टाकल्या गेल्यास एटीएमकडून त्या 100 च्या नोटा म्हणूनच विकरित होऊ शकतात. टोंकमधील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्येही असेच झाले. आणि लोकांना 100 ऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या. आता ज्या लोकांनी यादरम्यान पैसे काढले त्यांना नोटिसा पाठवून बँक ही रक्कम वसूल करण्याची शक्यता आहे.