तृणमूलचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल, तीन नगरपालिकांत सत्ता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:11 AM2019-05-29T04:11:43+5:302019-05-29T04:11:52+5:30
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे. त्या पक्षातील अनेकांना भाजप हाच राज्यातील सर्वांत मोठा, महत्त्वाचा व प्रसंगी विधानसभा निवडणुकीद्वारे सत्ता मिळवू शकणारा पक्ष बनू शकेल, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसमध्ये गळती सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूलच्या दोन आमदारांनी व ५० नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. इतके सारे नगरसेवक फुटल्याने पश्चिम बंगालधील तीन नगरपालिकांमध्ये आता भाजप सत्तेत येऊ शकेल. भाजपने या सर्व आमदार व नगरसेवकांना दिल्लीत आणून पक्षात प्रवेश दिला.
भाजपचे सरचिटणीस व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय व राज्यातील महत्त्वाचे नेते मुकुल रॉय यांनी पत्रकार परिषदेत आमदार व नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुतांश नगरसेवक उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आहेत. लोकसभा निवडणुकांत भाजपने १८ जागा जिंकून तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे.
मुकुल रॉय हेही तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते आहेत. आता त्यांचे पुत्र व तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशू रॉय (बिजापूर) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याबरोबरच याच पक्षाचे आणखी एक आमदार तुषारकांती भट्टाचार्य (विष्णुपूर) आणि हेमताबादचे माकपचे आमदार देवेंद्रनाथ रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे आणखी आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी या वेळी केला.
पश्चिम बंगालमध्ये दोन
वर्षांनी, २०२१ साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत तेथील पक्ष संघटना बळकट करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात येत
आहे. तृणमूलचे नेते व कार्यकर्तेच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी खूप मदत करू शकतील, असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत आहे.
>ममतांविषयी राग नाही
भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या एका नगरसेवकाला बाहेर पडण्याचे कारण विचारता तो म्हणाला की, आमचा ममता बॅनर्जी यांच्यावर राग नव्हता वा त्यांच्या कार्यपद्धतीविषयीही आमची तक्रार नव्हती.पण भाजप पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहून आपण प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आपण तृणमूल सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बहुसंख्य तृणमूल नगरसेवकांचेही हेच म्हणणे दिसले. भाजपमध्ये गेल्यास आपल्यालाही पुढे जाण्याची संधी मिळेल, असे या नगरसेवकांना वाटत आहे.