गोव्यातील पूल दुर्घटनेत दोन बळी
By admin | Published: May 20, 2017 12:32 AM2017-05-20T00:32:26+5:302017-05-20T00:32:26+5:30
येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची संख्या तीन झाली आहे. गुरुवारी पदपूल कोसळून सुमारे ७० जण जुवारी नदीत बुडाले होते.
- सुशांत कुंकळयेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे (गोवा) : येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची संख्या तीन झाली आहे. गुरुवारी पदपूल कोसळून सुमारे ७० जण जुवारी नदीत बुडाले होते. त्यातील काही पोहून किनाऱ्यावर आले. एकाचा मृतदेह गुरुवारी रात्री व दुसऱ्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे सापडला. नदीत आत्महत्या करणाऱ्या युवकाचाही मृतदेह दुपारी सापडला.
पूल दुर्घटनेनंतर किमान ३0 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र तसे आढळलेले नाही. अन्य कोणी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदविली गेलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शोधकार्य तात्पुरते बंद करण्यात आले. त्यापूर्वी नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पुण्यातील नॅशनल डिझॅस्टर रिस्पॉन्स पथकाच्या साहाय्याने दुर्घटनाग्रस्त भागातील नदीचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.
गुरुवारी रात्री बसवराज मरेनवार या तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास नौदलाच्या जवानांना अजितकुमार एक्का (२0) याचा मृतदेह सापडला. हे दोघेही त्या कमकुवत लोखंडी पुलावर उभे असताना नदीत कोसळले होते. पहाटे तीनच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरू झालेले शोधकार्य सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. दुपारी तीन वाजता शोधकार्याची सूत्रे नॅशनल डिझॅस्टर रिस्पॉन्स पथकाच्या जवानांनी घेतली.
सायंकाळी पाच वाजता तटरक्षक दलाच्या जवानांना नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या बसय्या संतोष वडाल या तरुणाचा मृतदेह सापडला. बसय्या याने नदीत उडी मारल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत होते. तर ही शोधमोहीम पाहण्यासाठी पुलावर मोठी गर्दी उसळली होती. त्याचदरम्यान हा पूल कोसळला होता. गुरुवारी रात्रीपर्यंत ३0 जणांना सुखरूपपणे बाहेर काढल्याचे प्रशासनाने सांगितले.
सकाळी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरद्वारेही शोधकार्य चालू होते. दुपारपर्यंत नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी शोधकार्य चालू ठेवले होते.
केपे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी सायंकाळी शोधकार्य बंद करण्याची सूचना केली. हे शोधकार्य बंद केले असले तरी पुण्यातील नॅशनल डिझॅस्टर रिस्पॉन्सचे पथक शनिवारपर्यंत सावर्डेतच राहणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.