हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:03 PM2024-09-18T18:03:05+5:302024-09-18T18:12:27+5:30
CAF जवानाने आपल्याच साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला.
छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. एका CAF जवानाने आपल्याच साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत दोन जवान शहीद झाले तर अन्य दोघे जखमी झाले. बुधवारी दुपारी एक वाजता ही घटना घडल्याचे समजते. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. येथील सुरगुजा विभागातील बलरामपूर येथील सामरी पोलीस स्टेशन परिसरात भुताही कॅम्प येथे बुधवारी ही घटना घडली. वादामुळे जवान अजय सिदारने अचानक गोळीबार सुरू केल्याचे सांगितले जात आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून तेथे उपस्थित असलेले इतर हवालदार धावत आले असता प्रकरणाची माहिती मिळाली.
गोळीबार करणाऱ्या जवानाला इतर हवालदारांनी ताब्यात घेतले. या घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जवान जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दुसरीकडे, जखमींपैकी जवान राहुल आणि अनुज शुक्ला यांना आरोग्य केंद्रात उपचारानंतर अंबिकापूरच्या वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
CAF जवानाकडून गोळीबार
खरे तर ज्या कॅम्पमध्ये गोळीबाराची घटना घडली तो कॅम्प मागील वर्षीच सुरू करण्यात आला होता. हा भाग पूर्वी नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली होता आणि तिथे रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. या मार्गावरील पहिले कॅम्प बंदरचुआ येथे सुरू करण्यात आले. त्यानंतर रस्तेबांधणीचे काम जसजसे पुढे जात होते, तसतसे भुताही येथे छावणी सुरू करण्यात आली. छत्तीसगड सशस्त्र दलाच्या जवानांसह सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाचे जवानही येथे तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच सर्व जवानांनी मिळून गोळीबार करणाऱ्या अजय सिदार या जवानाला पकडले. सध्या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.