‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:25 AM2024-06-28T09:25:54+5:302024-06-28T09:26:15+5:30

तपास हाती घेतल्यानंतर अटकेची पहिलीच कारवाई; प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देत उकळले होते पैसे 

Two who cracked NEET question papers in CBI neet | ‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर

‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर ‘सीबीआय’ने केलेल्या पहिल्या कारवाईत पाटणा येथून दोन आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली. मनीष कुमार, आशुतोष कुमार अशी आरोपींची नावे असून, त्यांनी परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांना एक सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली. दोन्ही आरोपींची पाटणा न्यायालयाने कोठडीत रवानगी केली आहे. ‘नीट-यूजी’प्रकरणी ‘सीबीआय’ने सहा ‘एफआयआर’ नोंदविले आहेत. आशुतोष कुमार याने पाटणा येथील लर्न बॉईज हॉस्टेल अँड प्ले स्कूलची जागा भाड्याने घेतली होती.

तिथे नीट प्रश्नपत्रिकेच्या जळालेल्या १२ प्रती बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाला सापडल्या होत्या. याच जागी काही परीक्षार्थींना फुटलेली प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका देण्यात आली होती. हे गैरकृत्य त्या जागेत होणार याची माहिती आशुतोष कुमारला होती हे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच हव्या होत्या, त्यांच्याकडून पैसे घेण्याबद्दलचा सारा व्यवहार मनिष कुमारने हाताळला होता. पैसे दिलेल्या उमेदवारांना मनिष कुमारने हॉस्टेलमध्ये आणले.

पेपरफूटीच्या दोषींना शिक्षा होईल,  केंद्र सरकार वचनबद्ध : राष्ट्रपती 
पेपरफुटीच्या अलीकडील घटनांची चौकशी करण्यासाठी आणि दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला उद्देशून केलेल्या अभिभाषणात गुरुवारी सांगितले. 

राष्ट्रपतींनी अभिभाषणात इतर मुद्द्यांबरोबरच सरकारने शैक्षणिक आघाडीवर उचललेल्या विविध पावलांचा उल्लेख करताच काही विरोधी सदस्यांनी ‘नीट’, ‘नीट’ अशी घोषणाबाजी केली. यावर राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, काही कारणाने परीक्षा विस्कळीत होत असतील तर ते योग्य नाही. पेपरफुटीच्या अलीकडच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकार कटिबद्ध आहे.   

लातूर नीटप्रकरण सीबीआयकडे, दिल्ली कनेक्शन : आरोपी गंगाधर सीबीआयच्या ताब्यात?

‘नीट’मध्ये गुणवाढ करून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी, पालकांना गंडविणाऱ्या आरोपींचा दिल्लीतील साथीदार गंगाधर सीबीआयच्या ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. लातूर, उमरगा (धाराशिव), सोलापूर, देगलूर (नांदेड) अशी साखळी असलेल्या प्रकरणाचा पुढील छडा सीबीआय लावणार असल्याचे गुरुवारी सुत्रांनी सांगितले. 

लातुरातील आरोपी जिल्हा परिषद मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि सोलापूर येथे शिक्षक असलेला संजय जाधव या दोघांनाही २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी आहे, तर मुख्याध्यापक व शिक्षकाशी समन्वय साधणारा मूळचा देगलूरचा इरण्णा कोनगलवार  अद्याप हाती लागलेला नाही. दिल्लीतून हैदराबादमार्गे लातूरशी संपर्क करणारा आरोपी गंगाधर सीबीआयच्या जाळ्यात अडकल्याचे सूत्र सांगत आहेत.

लातूर पोलिस पोहोचले तिन्ही राज्यांत
लातूर पोलिसांचे पथक झारखंड, उत्तराखंड, दिल्ली अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रकरणाचे मूळ शोधून काढत आहेत. गंगाधरचा ताबा मिळाल्यानंतर लातुरातील ज्या पालकांनी सबएजंट, आरोपी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडे पैसे दिले, त्याचे पुढे काय झाले? गंगाधरने दिल्लीतून पुढे नेमके काय केले आणि कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ झाला का, हा तपासाचा भाग आहे. 

Web Title: Two who cracked NEET question papers in CBI neet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.