धर्माच्या भिंती तोडून २ पत्नीने वाचवले एकमेकांच्या पतीचा जीव; समाजाला दिला आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:48 PM2023-04-21T15:48:09+5:302023-04-21T15:49:18+5:30
या परिस्थितीत दोन्ही कुटुंबासमोर मोठं आव्हान निर्माण झाले होते.
नवी दिल्ली - असं तर दोन्ही कुटुंबामध्ये ना रक्ताचे नाते आहे ना जुनी मैत्री...इतकेच नाही तर दोन्ही कुटुंबाचा धर्मही वेगळा, तरीही दोन्ही कुटुंबातील महिला एकमेकांच्या पतीच्या मदतीला धावून आल्या. यामुळे यूपी आणि जम्मू काश्मीरातील या दोन वेगवेगळ्या कुटुंबाचे कधीही न संपणारे नाते निर्माण झाले. दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयातील हे प्रकरण आहे. जिथे डॉक्टरांच्या एका टीमने २ रुग्णांची किडनी ट्रान्सप्लांट केली आहे.
या हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण उत्तर प्रदेशातून तर दुसरा रुग्ण जम्मू काश्मीर येथून उपचारासाठी आला होता. दोन्ही रुग्णांच्या पत्नीने किडनी स्वॅप करून डोनेट केली आणि पतीला पुन्हा जीवदान दिले. ६२ वर्षीय मोहम्मद सुल्तान डार काश्मीर इथं टेलिफोन विभागात काम करतात. तर माजी लष्कर अधिकारी ५८ वर्षीय विजय कुमार यूपीच्या बरेली येथे वास्तव्यास आहेत. या दोघांना असा आजार झाला ज्यामुळे रुग्णांची किडनी बदलण्याची वेळ आली. परंतु दोघांनाही डोनर मिळत नव्हता.
या परिस्थितीत दोन्ही कुटुंबासमोर मोठं आव्हान निर्माण झाले होते. कठीण काळात दोन्ही कुटुंबातील महिलांना किडनी स्वॅप करण्याचा धाडसी निर्णय घेतला. विजय कुमार यांच्या पत्नीने सुल्तान डार यांना किडनी दान केली तर मोहम्द सुल्तान डार यांच्या पत्नीने विजय कुमार यांना किडनी दान केली. हे दोन्ही रुग्ण १८ वर्षापासून डायलिसिसवर होते आणि किडनी ट्रान्सप्लांटसाठी फोर्टिस इथे आले.
रुग्णालयाचे प्रमुख संचालक डॉ. संजीव गुलाटी यांनी सांगितले की, दोन्ही प्रकरणात डोनरचे आणि रुग्णांचे ब्लडग्रुप जुळत नव्हते. अशावेळी एक पर्याय होता, तो म्हणजे अदलाबदली. हे भारतात खूप दुर्मिळ आहे. किडनी स्वॅपिंगचा निर्णय झाल्यानंतर रुग्णांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या. १६ मार्चला सहा डॉक्टरांच्या पथकाने ४ सर्जरी केल्या. ज्याला ६ तास लागले. हे ऑपरेशन यशस्वी झाले. या दोन्ही रुग्णांची तब्येत स्थिर झाल्यानंतर २७ मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. जर किडनी प्रत्यारोपण केले नसते तर रुग्ण जास्तीत जास्त ५ वर्ष जिवंत राहू शकले असते असं त्यांनी म्हटलं.