गोमांस नेत असल्याच्या संशयावरून दोन महिलांना जमावाकडून मारहाण
By admin | Published: July 28, 2016 12:46 AM2016-07-28T00:46:56+5:302016-07-28T00:46:56+5:30
गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मंगळवारी रेल्वेस्टेशनवर मारहाण करण्यात आली. या महिलांकडे म्हशीचे मांस होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे
मंदसौर : गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मंगळवारी रेल्वेस्टेशनवर मारहाण करण्यात आली. या महिलांकडे म्हशीचे मांस होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. स्वयंघोषित गोरक्षकांनी पोलिसांसमोर कायदा हातात घेतला तर जमलेल्या लोकांनी महिलांना वाचविण्याऐवजी घटनेचे चित्रीकरण सुरू केले.
गुजरातमध्ये गायीचे कातडे कमावल्यावरून दलित कुटुंबावर हल्ल्याची धग शांत होते न होते तोच ही घटना घडली. विरोधी पक्ष यावरून पुन्हा रान उठवित असून संसदेतही बुधवारी याचे पडसाद उमटले. पोलीस अधिक्षक मनोज शर्मा यांनी सांगितले की, गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन महिलांना रेल्वेस्टेशनवर मारहाण सुरू असल्याची माहिती एकाने फोनवरून दिली. त्यानंतर मी पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही महिलांना ठाण्यात आणले. त्यांच्याकडील मांसाची तपासणी करण्यात आली. तेव्हा ते गायीचे नाही तर म्हशीचे असल्याचे आढळले.
महिलांवर पशू अत्याचार निवारण कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या दोघींपैकी एकीवर यापूर्वीही अवैधरीतीने मांस नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे शर्मा यांनी सांगितले. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा असून लोकांनी संयम बाळगायला हवा. कोणत्याची स्थितीत कायदा हातात घेऊ नये. आम्ही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असेही शर्मा म्हणाले. (वृत्तसंस्था)
बसपा, काँग्रेसचा सरकारवर जोरदार हल्ला
या मारहाणीवरून विरोधी पक्ष बसपा व काँग्रेसने बुधवारी राज्यसभेत गोंधळ घालत केंद्र सरकारवर हल्ला केला. गुजरातमधील घटनेनंतर विरोधकांनी केंद्रातील सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. भाजपवर तुटून पडताना मायावती म्हणाल्या की, हे लोक एकीकडे मुलींचे रक्षण करण्याची आणि महिलांना मान-सन्मान देण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांच्यावर गुंड सोडतात. मायावती यांचे भाषण संपल्यानंतर बसपाचे सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरले आणि काँग्रेस सदस्यांच्या सोबतीने त्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
महिलाविरोधी सरकार, दलितविरोधी सरकार चालणार नाही, चालणार नाहीच्या घोषणा देत त्यांना सभागृह दणाणून सोडले. गोरक्षणाच्या नावावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी का निवेदन करीत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे सदस्य
आनंद शर्मा यांनी केला. गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेस पक्ष तत्त्वत: गोरक्षणाच्या विरोधात नाही.
तथापि, गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार निंदनीय असल्याचे सांगितले. आम्ही महिलांविरुद्धचा हिंसाचार कधीही योग्य ठरवू शकत नाही. या प्रकरणाबाबत मध्यप्रदेश सरकारने कारवाई केली आहे, असेही ते म्हणाले.
गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला
पोलिसांच्या समोर दुसऱ्या महिला प्रवाशांनी या महिलांना मारहाण केल्याचा आरोप मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी फेटाळून लावला. पोलिसांनी त्या महिलांना जमावाच्या तावडीतून वाचविले, असे ते म्हणाले.
‘त्या’ गायीला सिंहाने मारले
सुरत : गुजरातमध्ये मृत गायीचे कातडे कमावल्यावरून दलित कुटुंबाला स्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केली होती. या कुटुंबाने कातडे कमावण्यासाठी गायीला ठार मारल्याचा दावा गोरक्षकांनी केला होता; मात्र त्यांचा हा दावा खोटा असल्याचे तपासात आढळून आले. या गायीला दलित कुटुंबाने नाही तर सिंहाने ठार केले होते, असे पोलिसांनी सांगितले.