दोन वर्षांत भारत होणार टोलनाकेमुक्त, केंद्राची मोठी घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: December 18, 2020 01:16 PM2020-12-18T13:16:11+5:302020-12-18T13:20:12+5:30
Toll Plaza : कुठलाही नवा रस्ता बांधला, पूल, उड्डाणपूल उभारले की त्यावर संबंधित बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी टोल नाकेही उभे राहतात, असे चित्र आपल्याकडे गेल्या काही वर्षांत नित्याचेच झाले आहे.
नवी दिल्ली - कुठलाही नवा रस्ता बांधला, पूल, उड्डाणपूल उभारले की त्यावर संबंधित बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी टोल नाकेही उभे राहतात, असे चित्र आपल्याकडे गेल्या काही वर्षांत नित्याचेच झाले आहे. मात्र जागोजागी उभारण्यात येणाऱ्या या टोलनाक्यांपासून वाहनचालकांनी लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुढील दोन वर्षांत देश टोलनाक्यांच्या अडथळ्यांपासून मुक्त होणार असून, त्यासाठी जीपीएस प्रणाली वापरण्यात येणार आहे. तसेच वाहनांचा टोल हा वाहन धारकांनी लिंक केलेल्या बँक खात्यांमधून स्वीकारला जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
असोचेमच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, रशियन सरकारच्या मदतीने केंद्र सरकार लवकरच जीपीएस प्रणालीला अंतिम स्वरूप देणार आहे. ही बाब मार्गी लागल्यानंतर देशातील रस्ते आणि मार्ग पूर्णपणे टोलनाका मुक्त होईल.
दरम्यान, देशातील वाहनांसाठी केंद्र सरकारकडून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान फास्टॅगचा वापर सुरू झाल्यापासून इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. आता जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं उत्पन्न एक लाख ३४ हजार कोटींपर्यंत वाढेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.