इयरफोन लावून पबजी खेळणाऱ्या दोघांना ट्रेनने उडवलं, रेल्वे ट्रॅक ओलांडताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:02 AM2021-11-22T09:02:48+5:302021-11-22T09:05:56+5:30
दोघेजण सकाळी बाहेर फिरायला आले होते, यादरम्यान ट्रेनने त्यांना उडवलं.
मथुरा: मथुरा जिल्ह्यातील जमुना पार पोलिस स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी इअरफोन लावून मोबाईलवर PUBG गेम खेळणाऱ्या दोघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. कासगंज-मथुरा रेल्वे ट्रॅकवर लक्ष्मीनगरजवळ रेल्वेची धडक बसून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, जमुना पार पोलिस स्टेशनचे प्रभारी शशी प्रकाश शर्मा यांनी सांगितले की, लक्ष्मीनगरजवळ कासगंज-मथुरा रेल्वे मार्गावर गौरव(16) आणि कपिल (18) यांचे मृतदेह सापडले आहेत. दोघेही नजीकच्या कालिंदी कुंज कॉलनीतील रहिवासी असून पहाटे घरातून फिरायला आले होते.
स्टेशन प्रभारींनी सांगितले की, दोघांच्या मृतदेहाजवळ त्यांचे मोबाईल सापडले आहेत. त्यातील एकजण त्याच्या मोबाईलवर PUBG गेम चालवत होता. कानात इअरफोन टाकून गेम खेळत असल्यामुळे त्यांना ट्रेनचा आवाज आला नसावा, असा अंदाज आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे.