भारतासाठी खजिना उघडणार; निवडणुकीपूर्वी दुबईचा मित्र PM मोदींना मोठी भेट देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:25 PM2023-11-02T17:25:55+5:302023-11-02T17:27:05+5:30
भारतात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आखाती देशांसोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली.
दुबई - आखाती देशात सुमारे ३५ लाख भारतीय असलेल्या संयुक्त अरब अमिरातीचे सरकार भारतात ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. भारत हा UAE मुस्लिम देशाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देखील आहे. UAE ला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर नशीब आजमवायचं आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी UAE भारतात ५० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकते असं बोलले जात आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी UAE अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद यांच्या निमंत्रणावरून आतापर्यंत ५ वेळा अबुधाबीला भेट दिली आहे.
भारतात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आखाती देशांसोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. UAE सौदी अरेबियासह आखाती देशांच्या मुस्लिम देशांच्या प्रमुखांचा पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणात समावेश करण्यात आला होता. १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांच्या भेटीनंतर UAE ला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते यावरून पंतप्रधान मोदींच्या या पावलाचे महत्त्व लक्षात येते. आज, भारत आणि UAE मधील मैत्री सर्वोत्तम टप्प्यात आहे आणि दोन्ही देशांना तेलविरहित द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवायचा आहे.
UAE भारताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये आणि सरकारी संपत्तीत ५० अब्जची गुंतवणूक करू इच्छित आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी UAE भारतात या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करेल, असे मानले जात आहे. मात्र, एकूण गुंतवणूक आणि त्याची वेळ याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विश्लेषकांच्या मते, UAE भारतातील वेगाने वाढणाऱ्या मध्यमवर्गाकडे लक्ष देत आहे. UAE व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि कतारमधूनही भारतात मोठी गुंतवणूक केली जाऊ शकते.
एकीकडे अमेरिका विरुद्ध चीन असा जगात तणाव वाढत असताना UAE ने भारताच्या दिशेने पाऊल टाकले आहे आणि कोणत्याही एका देशाची बाजू घेण्यास नकार दिला आहे. आज UAE हा भारताचा प्रमुख भागीदार देश बनला आहे. भारत UAE आणि इस्रायल यांच्यात व्यापार आणखी वाढावा यासाठी करार करण्यात आले. UAE हा केवळ व्यापार आणि गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत नाही तर भारतासाठी परकीय चलनाचा एक प्रमुख स्रोत आहे. २०२१ मध्ये ३५ लाख भारतीय UAE मध्ये राहत होते. हे UAE च्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के आहे. हे भारतीय दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन भारतात पाठवतात. यामुळे भारताचा परकीय चलन साठा मजबूत आहे. केरळमधील सर्वाधिक लोक यूएईमध्ये राहतात. भारतातील लोक यूएईमध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.