मुस्लिम महिलेचे प्राण वाचवण्यासाठी हिंदू व्यक्तीचं रक्तदान; यूएईची राजकुमारी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:21 PM2020-05-08T16:21:13+5:302020-05-08T16:39:20+5:30
यूएईच्या राजकुमारीकडून भारतीय मुल्यांचं कौतुक
कानपूर: संकटाच्या काळात रक्तदान करुन मुस्लिम महिलेचे प्राण वाचवणाऱ्या अभिमन्यू गुप्ता यांचं कौतुक आता परदेशातूनही होऊ लागलं आहे. अभिमन्यू यांच्या या कृतीची संयुक्त अरब अमिरातीच्या राजकुमारीनं प्रशंसा केली आहे. त्यांनी अभिमन्यू गुप्ता यांच्यासह भारतीय मूल्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
फर्रुखाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या सैनिक कुटुंबाच्या सदस्य असलेल्या ५५ वर्षीय शहाना बेगम यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. त्यांना डायलिसिससाठी कानपूरच्या हवाई दलाच्या रुग्णालयात जायचं होतं. डायलिसिससाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. त्यांचे पती निसार खान आणि मुलगा शैजी खान यांनी अनेकांकडे मदत मागितली. मात्र हाती निराशा आली. त्यांच्या नातेवाईकांनीदेखील मदत करण्यास असमर्थतता दर्शवली.
शहाना बेगम यांच्या कुटुंबीयांनी कानपूर कैंटमध्ये राहणाऱ्या उत्तर प्रदेश व्यापारी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अभिमन्यू गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. आपली अडचण त्यांनी अभिमन्यू यांना सांगितली. बेगम यांच्या कुटुंबीयांनी व्यथा मांडताच अभिमन्यू लगेचच मदत करण्यास तयार झाले. २७ एप्रिल रोजी त्यांनी रक्तदान केलं आणि शहाना यांचा जीव वाचवला. याबद्दलचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं. त्यानंतर अनेकांनी अभिमन्यू यांचं कौतुक केलं.
देशभरातून कौतुक सुरू असताना आता संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी आणि प्रसिद्ध समाजसेविका हेंड अल कासिमी यांनीदेखील अभिमन्यू यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. 'लॉकडाऊनच्या काळात एका हिंदूनं मुस्लिम रुग्ण महिलेसाठी रक्तदान दिलं. महिलेचे नातेवाईक मागे हटले, तेव्हा एक हिंदू मदतीसाठी पुढे आला,' असं कासिमी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हाच तो भारत आहे ज्याच्या मूल्यांवर विश्वास ठेवून मी मोठी झाले, अशा शब्दांत त्यांनी भारताचंही कौतुक केलं. ट्विटरवर कासिमी यांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी असून अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.