महागाईचा आणखी एक झटका; UBER च्या कॅब सेवेचे दर १२ टक्क्यांनी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:00 PM2022-04-11T22:00:38+5:302022-04-11T22:01:23+5:30
UBER नं आपल्या टॅक्सी चालकांची मागणी मान्य केली असून टॅक्सी सेवांचे दर १२ टक्क्यांनी वाढवले आहेत.
देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या (Petrol Diesel CNG Price Hike) दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळेच UBER आणि OLA कंपनीच्या टॅक्सी चालकांनी कॅबच्या सेवेचे दर वाढवण्याची मागणी केली होती. आता उबरनं ही मागणी मान्य करत हे दर १२ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत.
"आम्ही आमच्या चालकांचे फिडबॅक समजतो. इंधनाच्या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ते चिंतीत आहेत. आम्ही आमच्या चालकांची मदत करण्यासाठी ट्रिप प्राईज दिल्ली एनसीआरमध्ये १२ टक्क्यांनी वाढवत आहोत. आम्ही यापुढेही इंधनाच्या दरावर लक्ष ठेवणार आहोत आणि गरज भासल्यास पुढील निर्णय घेऊ," असंही त्यांनी सांगितलं. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा ओला आणि उबेरचे चालक संपावर गेले आहेत.
उबरनं आता एक पाऊल पुढे टाकत आपले दर १२ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवास करताना १२ टक्के अधिक फेअर द्यावं लागणार आहे. अशामुळे ग्राहकांच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. तर दुसरीकडे चालकांना काहीसा दिलासा मिळालाय. ज्या प्रकारे उबरचे चालक मागणी करत होते, तशी मागणी ओलाच्या कॅब चालकांकडूनही करण्यात येत होती. सध्या दिल्ली एनसीआरमध्ये हे दर वाढले असले तरी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोलडिझेल आणि सीएनजीच्या दरावरून अन्य ठिकाणी दर वाढवले जातील का? असा प्रश्न उपस्थित होतोय.