उबर टॅक्सीचालकाला मरेपर्यंत जन्मठेप
By admin | Published: November 4, 2015 02:06 AM2015-11-04T02:06:10+5:302015-11-04T02:06:10+5:30
अकरा महिन्यांपूर्वी आपल्या टॅक्सीत एका २५ वर्षीय महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करणारा उबर टॅक्सीचालक शिवकुमार यादव याला दिल्लीच्या एका न्यायालयाने मंगळवारी
नवी दिल्ली : अकरा महिन्यांपूर्वी आपल्या टॅक्सीत एका २५ वर्षीय महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करणारा उबर टॅक्सीचालक शिवकुमार यादव याला दिल्लीच्या एका न्यायालयाने मंगळवारी त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
विवाहासाठी बाध्य करण्याच्या हेतूने या महिलेचे अपहरण करणे आणि तिच्यावर बलात्कार करण्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आलेला ३२ वर्षीय शिवकुमार यादव याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ही मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ‘आरोपीला (यादव) भादंविच्या कलम ३७६ (२) (एम) (जबर दुखापत करीत बलात्कार करणे), ३६६, ५०६ आणि ३२३ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आरोपीला तो नैसर्गिकरीत्या जिवंत असेपर्यंत ही शिक्षा भोगावी लागेल. या शिक्षेसोबतच आरोपीला २१ हजार रुपये दंडही ठोठावण्यात येत आहे,’ असे न्या. बावेजा म्हणाल्या. बलात्कार पीडितेला नुकसानभरपाई देण्याचे आणि आरोपीच्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे निर्देशही न्या. बावेजा यांनी दिले. न्या. बावेजा यांनी तब्बल दीड तासपर्यंत फिर्यादी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल जाहीर केला. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच आरोपी यादव, त्याची पत्नी, वडील आणि दोन्ही अल्पवयीन मुलींनी न्यायालयातच हंबरडा फोडला.